पणजी : केंद्र सरकारने गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
पर्रीकर यांचे मार्च 2019 मध्ये निधन झाले होते. त्यानंतर आज त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री म्हणून पर्रीकर यांनी केलेल्या देशसेवेची दखल घेत केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे. पहिल्यांदाच गोव्यातील एखाद्या राजकीय व्यक्तीची या पुरस्कारसाठी निवड झाली आहे. त्यामुळे आम्हाला याचा अभिमान वाटतो. आम्ही केंद्र सरकारचे आभारी आहोत, असेही सावंत यांनी सांगितले आहे.