मुंबई - आठ महिन्यांपूर्वी आत्महत्या केलेल्या नायर रुग्णालयातील डॉ. पायल या माझ्या मुलीला अजूनही न्याय मिळत नाही. यासाठी इतकी दिरंगाई का केली जाते? माझ्या मुलीला न्याय मिळणार कधी, असा सवाल डॉ. पायल तडवीच्या कॅन्सरग्रस्त आईने उपस्थित केला.
आठ महिन्यांपासून माझ्या मुलीला लवकर न्याय मिळावा म्हणून जळगावहून मुंबईला चकरा मारते. मी कॅन्सरग्रस्त आणि मुलगा अपंग आहे, अशा स्थितीत मी न्यायासाठी धडपडत आहे. मागच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आर्थिक मदत देऊ, असे सांगितले होते. मात्र, आत्तापर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही. समाजकल्याण विभागाने सुरुवातीला थोडी मदत केली. त्यानंतर त्या विभागानेही काही केले नाही. अनेकदा निवेदने दिले. मात्र, त्यांचा उपयोग होताना दिसत नाही. सरकारने आर्थिक मदत द्यावी आणि माझ्या मुलाला शासकीय सेवेत घ्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
कॅन्सरची रुग्ण असल्यामुळे डॉक्टरने मला प्रवास न करण्यास सांगितले आहे. मात्र, माझ्या मुलीला न्याय मिळावा म्हणून जळगाहून खटल्यासाठी मुंबईला येते. मात्र, कोणत्याही प्रकारच्या सोईसुविधा दिल्या जात नाही. याचा सरकारने विचार करावा आणि मला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
रुग्णालयात युनिट हेड असलेल्या डॉ. चींगलींग यांना माझ्या मुलीच्या आत्महत्या प्रकरणात सहआरोपी करा म्हणून मागणी केली होती. मात्र, त्यांना वाचवले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मागील आठ महिन्यात त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे सहआरोपी का केले जात नाही? त्यांना पाठीशी का घातले जातेय का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.