मुंबई - कोट्यवधी आंबेडकरी अनुयायायी बाबासाहेबांच्या ज्या आंतराष्ट्रीय स्मारकाची प्रतीक्षा करत आहेत, ते स्मारक २०२०मध्ये तयार होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. "अखंड भीम ज्योतीचे" या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही घोषणा केली.
लोकसभेच्या आचारसंहितेला काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना सरकारने राज्यातल्या विविध भागात उद्घाटन आणि भूमीपूजनाच्या कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी इंदू मिलच्या स्मारकाचा विषय काढून दलितांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. या अखंड ज्योतीच्या मुद्यावरही राजकारण होताना दिसत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या प्रयत्नाने चैत्यभूमीवर "अखंड भीम ज्योत" तेवत ठेवण्याच्या कार्यक्रमाचे प्रयोजन करण्यात आले होते.
शेवाळे यांनी केंद्रीय स्तरावर तसे प्रयत्नही केले होते. मात्र, ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. परंतु, आता शेवाळे यांच्या आधी भाजपकडून अन्य ठिकाणी भीम ज्योत लावण्यात आघाडी घेण्यात आली आहे. डॉ. आंबेडकर जयंती अथवा महापरिनिर्वाण असे कोणतेही प्रयोजन नसताना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने हा कार्यक्रम पार पाडला आहे.