मुंबई - कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनत चाललेल्या अंधेरी पूर्व ते जोगेश्वरी पूर्व या के पूर्व विभागात अखेर कोरोना हळूहळू नियंत्रणात येऊ लागला आहे. आज येथे 72 रूग्ण आढळले असून मागील तीन दिवसांत हा आकडा 80 च्या आत रोखण्यात मुंबई महानगरपालिकेला यश आले आहे. याचे कारण म्हणजे धारावीतील डोअर टू डोअर थर्मल स्क्रिनिंग पॅटर्न हा पॅटर्न येथेही मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. त्यामुळे, येथे कोरोना नियंत्रणात येत असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
धारावीतील परिस्थिती नियंत्रणात येत असताना मुंबईत अंधेरी आणि जोगेश्वरी पूर्व हा परिसर नवा हॉटस्पॉट म्हणून समोर आला. 13 जूनला तर येथे सर्वाधिक 133 रूग्ण आढळले होते. तर, आकडा गेल्या काही दिवसात असाच वाढता होता. एकूणच येथील रुग्ण वाढत असल्याने पालिकेची चिंताही वाढली होती. या परिसरात 70 टक्के झोपडपट्टी आहे. याठिकाणी दोन मोठी पालिकेची कोविड रुग्णालये, दोन विमानतळ आणि इंडस्ट्रियल एरिया असल्याने येथे कोरोना कसा रोखायचा असा प्रश्न निर्माण झाला.
या पार्श्वभूमीवर डोअर टू डोअर थर्मल स्क्रिनिंगला वेग देण्यात आला आहे. प्रत्येक परिसरात शिबीर घेत स्क्रिनिंग करण्यात येत आहे. यातून संशयित रूग्ण आणि संपर्कातील नागरिक शोधून त्यांना वेळीच क्वारंटाईन करता येत आहे. तर कंटेनमेंट झोनमध्ये नियमाचे कडक पालन होत आहे. या सर्व उपाययोजनामुळे गेल्या तीन दिवसांत रूग्ण कमी झाल्याची माहिती के पूर्वचे वॉर्ड ऑफिसर प्रशांत सपकाळे यांनी दिली आहे.
परिणामी गेल्या तीन दिवसांत येथील रूग्ण संख्येत मोठी घट झाली आहे. 16 जूनला 80 रूग्ण तर 17 जूनला 80 रुग्ण आढळले आहेत. 100 च्या पुढे हा आकडा न गेल्याने पालिकेची चिंता थोडी कमी झाली असून आज तर रूग्ण संख्या आणखी घटली आहे. आज येथे 72 रूग्ण कोरोनाग्रस्त झाल्याचे सपकाळे यांनी सांगितले आहे. तर, लवकरच येथील कोरोनाही नक्कीच नियंत्रणात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.