मुंबई : कफ परेड येथे सोमवारी (26 एप्रिल) सुमारे दीडशे किलो वजनाचा डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळून आला. भांडुप मँग्रोव्ह (कांदळवन कक्ष) परिसरात वन विभागाने डॉल्फिनची विल्हेवाट लावली, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.
गेल्यावर्षीपासून आतापर्यंत 10 डॉल्फिन मृत-
स्थानिक मच्छिमार कफ परेड समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारायला गेले होते. यावेळी साडेसात फूट लांबीचा, दीडशे किलो वजनाचा मृत डॉल्फिन मासा आढळून आला. स्थानिकांनी ही माहिती सागरी पोलीस ठाण्याला दिली. सागरी पोलीस ठाणे, मुंबई महापालिका आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत डॉल्फिनला महापालिका कर्मचारी आणि क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढले. हा मासा हमबैक या प्रजातीचा होता, अशी माहिती वन विभागाचे अधिकारी सुरेश वरक यांनी दिली. भांडूप मँग्रोव्ह येथे डॉल्फिनची विल्हेवाट लावली असून अंदाजे तीन दिवसांपूर्वी तो मृत झाला असावा, असा अंदाज वरक यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षभरापासून आतापर्यंत 10 डॉल्फिन मृत आढळून आल्याचे वरक यांनी सांगितले.