मुंबई - त्रिपुरामध्ये घडलेल्या कथित घटनेबाबत राज्यात पडसाद उमटले. खासकरून अमरावतीमध्ये निघालेल्या निषेध मोर्चाला हिंसक वळण लागल्याने अमरावती शहरातील शांतता भंग झाली. मात्र, आता अमरावती शहरदेखील शांत झाले आहे. तरीही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून जाणीवपूर्वक चिथावणी खोर वक्तव्ये केली जात आहेत. ((congress state president nana patole criticize bjp over amravati violence) भारतीय जनता पक्ष आपल्या राजकीय स्वार्थासाठी दंगली भडकावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसेच भारतीय जनता पक्षाला गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी केला. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (congress state president nana patole criticize bjp)
भाजप नेते महाराष्ट्र विरोधी पक्षाचे नेते आहेत का?
राज्यातील नांदेड, मालेगाव आणि अमरावती शहरात झालेले प्रकार हा चिंतेचा विषय आहे. राज्य सरकारने वेळीच परिस्थिती आटोक्यात आणली आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाकडून परिस्थिती चिघळवून धार्मिक विद्वेष कसा पसरवता येईल? यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वास्तविक पाहता महाराष्ट्र शांत राहावा, यासाठी एक जबाबदार विरोधीपक्ष म्हणून भाजपने पुढाकार घ्यायला हवा. मात्र, भाजपचे नेते प्रक्षोभक वक्तव्ये करून आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. भाजप नेत्यांची वक्तव्ये पाहता ते लोकांना दंगलीसाठी भडकावत असल्याचे दिसत असून ते विरोधी पक्षाचे नेते आहेत, का महाराष्ट्र विरोधी पक्षाचे नेते आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा - Amravati Violence देवेंद्र फडणवीसांनी बेजबाबदार वक्तव्ये करू नयेत- यशोमती ठाकूर
उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत फायदा मिळण्यासाठी भाजपचे प्रयत्न -
गुजरातमध्ये गोध्रा दंगलीसारखे प्रयोग करुन देशभर त्याचे लोण पसरवण्याचे काम भाजपने केले. आता त्यांच्याकडून महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करुन राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी महाराष्ट्रात आग लावण्याचा धंदा काही नेत्यांनी सुरू केला आहे. मात्र, महाराष्ट्राची सुज्ञ आणि समंजस जनता त्यांच्या कुटील कारस्थानांना बळी पडणार नाही. भाजप नेत्यांनी हा आततायीपणा सोडून महाराष्ट्रात शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.