मुंबई - कोरोनामुळे निधन झालेल्या सहकारी डॉक्टरला सरकारने विमा कवच नाकारले गेल्यामुळे डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने मनसेप्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. याभेटी दरम्यान डॉक्टरांच्या समस्या मांडण्यात आल्या. यावेळी सरकारविरोधात डॉक्टरांनी संताप व्यक्त केला. डॉक्टरांच्या समस्यासंदर्भात आरोग्यमंत्री आणि सरकारसोबत चर्चा करू, असे राज ठाकरेंनी शिष्टमंडळाला सांगितले.
हेही वाचा-कंगनाला न्याय द्या; रामदास आठवलेंची राज्यपालांकडे मागणी
राज्य सरकारने कोरोना काळात 50 लाख रुपयांचा विमा डॉक्टरांना व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना लागू केला. कोरोना काळात डॉक्टर अहोरात्र काम करत आहेत. मात्र, खासगी क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या डॉ. भास्कर सुरगडे यांचे कोविडने निधन झाले. 'खासगी' कारण सांगत विम्याचा दावा फेटाळून लावण्यात आला. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ डॉक्टरांनी राज ठाकरे यांची भेट घेत डॉ. सुरगडे यांच्या विम्याचा प्रश्न तसेच विविध समस्या मांडल्या. राज ठाकरेंनी आरोग्यमंत्री टोपे व सरकारशी चर्चा करून सुरगुडे यांना विमा व डॉक्टरांना संरक्षण मिळून देऊ, असे सांगितल्याचे डॉ. मनगिरिश यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे व संतोष धुरी यांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी डॉक्टरांच्या विम्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यास सांगितले आहे. डॉ. मनगिरिश डॉ. नबर झुबेर शेख, डॉ. विनायक म्हात्रे, डॉ. दिलीप लोखंडे, डॉ. विश्वजीत पाताडे यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची आज भेट घेतली आहे. दिवंगत डॉ. भास्कर सुरगडे यांच्या कुटुंबियांना मनसे न्याय मिळवून देईल अशी खात्री आहे, असे राज ठाकरे यांच्या भेटीनंतर डॉक्टरांनी सांगितले.