मुंबई - कोरोनाची लागण झाल्यामुळे आतापर्यंत 3 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे, 55 वर्षांवरील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना घरीच थांबवण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्त परामबीर सिंग यांनी घेतला. अशात आता या पोलिसांचे पगार सुट्टीच्या रूपात कापू नका, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने केली आहे.
देश कोरोनासोबत लढा देत असताना पोलीस दिवसरात्र रस्त्यावर उतरुन आपले कर्तव्य पार पाडत आहेत. या परिस्थितीत अनेक पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याच कारणामुळे 55 वर्षांवरील पोलिसांना घरीच राहण्याचा सल्ला दिला गेला. पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाचे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी स्वागत करत आभार मानले आहेत. तसेच या पोलिसांच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी असल्याने त्यांना पूर्ण पगार देण्यात यावा, अशी मागणी राहूल दुबाले यांनी केली आहे.