मुंबई : Diwali Bonus २०२३ : राज्य सरकारच्या वतीनं राजपत्रित अधिकाऱ्यांना यंदा दिवाळीपूर्वी (Diwali 2023) अतिशय भव्य अशी ऑफर दिली आहे. राजपत्रित अधिकाऱ्यांना चारचाकी वाहन खरेदीसाठी 15 लाख रुपयांची अग्रीम रक्कम देण्यात येणार आहे. त्यामुळे राजपत्रित अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यंदा राजपत्रित अधिकाऱ्यांच्या घरासमोर नक्कीच चारचाकी गाड्या दिसणार आहेत.
काय आहे निर्णय? : राजपत्रित अधिकाऱ्यांना नवीन वाहन खरेदीसाठी राज्य सरकारनं 15 लाख रुपयांची अग्रीम रक्कम देण्याचा निर्णय घेतलाय. तर जुनी गाडी खरेदी करण्यासाठी साडेसात लाख रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे. ही अग्रीम रक्कम 100 समान हप्त्यात संबंधित अधिकाऱ्यांना फेडावी लागणार आहे. या व्यतिरिक्त या रकमेवर दहा टक्के व्याज आकारण्यात येणार आहे. ही रक्कम 40 हप्त्यांमध्ये वसूल केली जाणार आहे. त्यामुळे ही रक्कम संबंधित अधिकाऱ्यांना बारा वर्षात परत करावी लागणार आहे. तर जुन्या गाडीसाठी हा कालावधी सहा वर्षांचा ठेवण्यात आला आहे. जोपर्यंत सर्व हप्ते परत होत नाहीत तोपर्यंत ही गाडी सरकारी दप्तरी गहाण म्हणून राहणार आहे. तसेच अग्रीम रक्कम मंजूर झाल्यानंतर एक महिन्याच्या आत गाडी खरेदी करण्याचं बंधन ठेवण्यात आलं आहे. जर संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत पैशाचा परतावा केला नाही तर संबंधित अधिकाऱ्याच्या गाडीचा लिलाव करून ही रक्कम वसूल करण्यात येईल, असंही या निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.
सरकारकडून सवलतीच्या दरात कर्ज : या संदर्भात बोलताना राजपत्रित अधिकारी मिलिंद सरदेशमुख म्हणाले की, राज्य सरकारच्या वतीनं सरकारी कर्मचाऱ्यांना यापूर्वीही अनेकदा विविध खरेदीसाठी सवलती देण्यात आल्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना घर खरेदीसाठी, दुचाकी खरेदीसाठी अशाच पद्धतीनं सवलतीच्या व्याजदरात निधी उपलब्ध करून दिला जातो. त्याचप्रमाणे आता चारचाकी गाडी खरेदीसाठी ही योजना आणण्यात आली आहे. मात्र, हे सरकारच्या वतीनं राजपत्रित अधिकाऱ्यांना देण्यात येणारी योजना आहे. त्यामुळे यात अधिकाऱ्यांवर उधळपट्टी होत आहे असं म्हणता येणार नाही.
हेही वाचा -