ठाणे - ठाण्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन कल्याण हा स्वतंत्र जिल्हा तयार व्हायला हवा, अशी मागणी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी केली आहे. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या दरम्यान, त्यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत संवाद साधला.
आमदार कथोरे यावेळी म्हणाले, नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत 12 आमदारांसह झालेल्या बैठकीत त्यांनी ही मागणी केली. म्हणून विभाजन झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने या विभागाचा विकास होईल. यासाठी ते प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. तर अर्थसंकल्पानंतर यावर निर्णय होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - मुलाचे पदवीप्रमाणपत्र खोटे असल्याचे सिद्ध! गोवा उपसभापतींनी तत्काळ पायउतार होण्याची विरोधकांची मागणी
बारवी धरण पूर्ण झाले. मात्र, नियोजन अजून चांगल्या पद्धतीने झालेले नाही. ज्या यंत्रणेला पाणी उचलायचे आहे, त्या यंत्रणांना त्यांच्याकडे योग्य त्या सुविधा नाहीत. याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बातम्यांमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. पोल्ट्री टाकलेल्या शेतकऱ्यांना सरकारने अनुदान द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. याबरोबरच अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान चिकलोली परिसरात रेल्वे स्थानक व्हावे, या मागणीनंतर त्याला मंजूरी मिळाली आहे. लवकरच ते काम सुरू होईल आणि याठिकाणी रेल्वे स्थानक तयार होईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.