मुंबई: पश्चिम रेल्वेनंतर सर्वप्रथम मध्य रेल्वेने ३० जानेवारी २०२० पासून ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान पहिली एसी लोकल सुरू केली. त्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर डिसेंबर २०२० पासून सीएसएमटी ते कल्याण मार्गावर दुसरी एसी लोकल चालविण्यात आली. मात्र, कमी फेऱ्या आणि जास्त भाडे यामुळे प्रवाशांनी एसी लोकलला पाठ दाखविली. पीक अव्हरमध्ये कोणी एसी लोकलमध्ये चढत नव्हते. त्यामुळे रिकाम्या एसी लोकल धावत होत्या. एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात केल्यानंतर (AC local fare reduction) मध्य रेल्वेच्या एसी लोकलला चांगली पसंती मिळत आहे.
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर मात्र एसी लोकलला पाहिजे तितका प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवर हार्बर मार्गावरील एसी लोकल चालविण्याचा (AC local on the main railway line) विचार मध्य रेल्वेकडून सुरु आहे. याबाबद रेल्वे अधिकाऱ्यांचा बैठका सुरु असल्याची माहिती रेल्वेचा एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सध्या मध्य रेल्वेचा मुख्य मार्गावर ४४ आणि ट्रान्सहार्बर मार्गावर १६ अशा एकूण ६० एसी लोकल फेऱ्या धावत आहेत.
मात्र, ट्रान्सहार्बर मार्गावर धावणाऱ्या १६ एसी लोकलला प्रवाशांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत असल्याने मध्य रेल्वे या एसीही लोकलचे मार्ग बदलविण्याचा विचार करत आहे. जानेवारी २०२२ पासून सीएसएमटी आणि गोरेगाव/ वांद्रे आणि वाशी/ पनवेल स्थानकाचा दरम्यान १६ एसी लोकल सेवा सुरु केल्या होत्या. मात्र, आता हार्बर मार्गावरील एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने या लोकल मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवर चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.