मुंबई - मालाड येथील मढ समुद्र बेटावर राहणाऱ्या 70 आदिवासी कुटुंबीयांना एका महिन्याचे रेशन आणि इतर महत्त्वाच्या साहित्यांचे वाटप बुधवारी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले.
गेल्या चार आठवड्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे या आदिवासींच्या जीवनावर गंभीर परिणाम झाला. या परिसरातील आदिवासी समुद्रात खेकडे पकडून विक्री करत उदनिर्वाह करतात. पण लॉकडाऊनमुळे त्यांचे जगण्याचे एकमेव साधन संपले. खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह उत्तर मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष गणेश खणकर आणि भाजयुमोचे मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांनी आदिवासी वस्ती असलेल्या ठिकाणी आज भेट दिली. त्यानंतर आदिवासी कुटुंबांना एक महिना पुरेल इतके पीठ, डाळी, तांदूळ, धान्य आणि इतर साहित्य दिले.
करोना संसर्गामुळे ज्या लोकांनी रोजीरोटी गमावली त्यांची उपासमार होऊ देणार नाही. यापुढे असे रेशन देण्याची व्यवस्था करू, असे आश्वासन गोपाळ शेट्टी यांनी दिले.