मुंबई - भारतात प्राचीन काळापासून आयुर्वेदिक उपचार पद्धती अवलंबली जात आहे. तर 5000 वर्षांपूर्वी आयुर्वेदातच शस्त्रक्रियेचा उगम झाला असून आचार्य शुश्रूत यांनी ही पद्धती शोधून काढली. तर पुढे अॅलोपॅथीमध्ये त्याचा विकास झाला. तर आयुर्वेदिक एमएस डॉक्टर सुरुवातीपासून काही शस्त्रक्रिया करत आहेतच. मग आता या गोष्टीला कायद्याच्या चौकटीत बसवल्यानंतर त्याला विरोध का? असा सवाल आता आयुष डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. तर इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या विरोधी भूमिकेवर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. त्याचवेळी आयएमएच्या आंदोलनाला जशाच तसे उत्तर दिले जाईल, अशी कडक भूमिकाही आयुष डॉक्टरांनी घेतली आहे. त्यामुळे आता आयुष विरुद्ध आयएमए, असा संघर्ष पेटला तर आश्चर्य वाटायला नको.
58 आयुर्वेदिक शस्त्रक्रियासाठी परवानगी
आयुर्वेदिक शस्त्रक्रिया काही प्रमाणात होत असल्या तरी त्या कायद्याच्या चौकटीत येत नव्हत्या. त्यामुळे आता केंद्र सरकारने याला कायद्याच्या चौकटीत आणले आहे. 20 नोव्हेंबरला केंद्रीय मंत्रालयाच्या कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने काढलेल्या अध्यादेशानुसार आता आयुर्वेदिक शस्त्रक्रियेला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. तर 58 आयुर्वेदिक शस्त्रक्रिया याअंतर्गत एमएसचे शिक्षण घेतलेल्या आयुष डॉक्टरला करता येणार आहेत. यात जनरल सर्जरी, युरोलॉजी (मूत्ररोग शस्त्रक्रिया), सर्जिकल गॅस्ट्रोएटरॉलॉजी ( पोटाच्या आणि आतड्याच्या शस्त्रक्रिया), ईएनटी (कान-नाक-घसा), नेत्रविकार शस्त्रक्रिया, दंतरोग शस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे. दरम्यान, मेंदू आणि हृदयाशी संबंधित शस्त्रक्रियेसह प्रत्यारोपण शस्त्रक्रिया या डॉक्टरांना करता येणार नाहीत.
विरोध कशाला?
आयुर्वेदिक शस्त्रक्रिया पद्धती आणि आयुर्वेदात एमएस पदवी मिळवणारे डॉक्टर देशात मोठ्या संख्येने आहेत. तर शस्त्रक्रियेचा उगमच आयुर्वेदात झाला असून आचार्य शुश्रूत यांनी ही उपचार पद्धती शोधून काढली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील गीता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुश्रूत संहिता ग्रंथात त्याचा उल्लेख आहे. तर आयुर्वेदात पदवी घेतल्यानंतर अनेक डॉक्टर एमएस (शल्य) चे शिक्षण घेत पुढे आयुर्वेदिक शस्त्रक्रिया करतात. पण, कायद्याच्या चौकटीत या गोष्टी नव्हत्या. आता मात्र आता याला कायद्याच्या चौकटीत आणण्यात आले असून ही स्वागताहार्य बाब असल्याची प्रतिक्रिया 'निमा' (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन) च्या मुंबई शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय लोंढे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. केंद्राच्या निर्णयानुसार उलट आता या ठरविक शस्त्रक्रिया आयुष डॉक्टरांना करता येणार आहेत. मेंदू, हृदय आणि प्रत्यारोपणसारख्या शस्त्रक्रियांवर निर्बंध आले आहेत. तेव्हा ही बाब दिलासादायक आहे. मग हा विरोध कशाला असा सवाल ही त्यांनी केला आहे.
वाद पेटणार
केंद्र सरकारच्या या निर्णयाला आयएमएने विरोध केला आहे. तर हा निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी करत यासाठी देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. आजपासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. निवासी डॉक्टरांपासून तज्ज्ञ डॉक्टर यात सहभागी होत आहेत. महत्त्वाचे म्हणजे 11 डिसेंबरला देशभरातील अॅलोपॅथी डॉक्टर 12 तासासाठी संपावर जाणार आहेत. आयएमएच्या या भूमिकेवर 'निमा'ने नाराजी व्यक्त केली आहे. जाणीवपूर्वक आयएमए या निर्णयाला विरोध करत आहे. ऍलोपॅथी डॉक्टरांच्या 'एकाधिकारशाही'ला यामुळे धक्का बसला आहे. हीच बाब त्यांना खुपत आहे आणि म्हणूनच याला विरोध होत आहे असा आरोप ही डॉक्टर लोंढे यांनी केला आहे. त्याचवेळी यांच्या आंदोलनाला गरज पडल्यास आम्ही ही जशाच तसे उत्तर देऊ. तर हे प्रकरण न्यायालयात गेले तर न्यायालयातही आम्ही लढू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तेव्हा येत्या काळात हा मोठा वादाचा मुद्दा होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.