मुंबई : 20th Third Eye Asian Film Festival : सिनेमा हे माझं जग आहे, तर थिएटर हे माझं घर आहे. त्यामुळे या गोष्टींपासून मी कधीच दूर जाऊ शकत नाही. 'एशियन कल्चर’ पुरस्काराने मला सन्मानित केल्याबद्दल मी एशियन फिल्म फाऊंडेशनचा ऋणी असून, हा पुरस्कार मी विनम्रपणे स्वीकारतो, अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी व्यक्त केली. "या महोत्सवाच्या माध्यमातून आजच्या पिढीपर्यंत जागतिक दर्जाचा चित्रपट पोहचावा. तसंच, कलेची वेगवेगळ्या संस्कृतीची ओळख आजच्या तरुण पिढीला करून देणे हे या महोत्सवाचं उद्दिष्ट आहे, असं मत चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, चैतन्य शांताराम, दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्युरी मेंबर स्मिता तांबे, ज्ञानेश झोटिंग आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
'सत्यजित रे' पुरस्काराने गौरविण्यात : दरम्यान, या चित्रपट महोत्सवात प्रभात फिल्म सोसायटीचे संस्थापक, चित्रपट समीक्षक कै. सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी देण्यात येणारा चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार लेखक प्रकाश मगदुम यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या 'द महात्मा ऑन सेल्युलॉइड' या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कामाकरिता फिल्म सोसायटी चळवळीचे कार्यकर्ते सुभाष देसाई यांना 'सत्यजित रे' पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
कलाकृतींना प्रोत्साहन दिलं पाहिजे : या महोत्सवाच्या माध्यमातून आजच्या पिढीपर्यंत जागतिक दर्जाचा चित्रपट पोहचावा. तसेच, कलेची वेगवेगळ्या संस्कृतीची ओळख आजच्या तरुण पिढीला करून देणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट असल्याचं मत चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे यांनी यावेळी व्यक्त केलं. नवे तंत्रज्ञान आत्मसात करत वेगळ्या कलाकृतींना प्रोत्साहन दिलं पाहिजे. यासाठी सगळ्यांनी एकत्र काम करणं गरजेचं असल्याचं देखील त्यांनी आवर्जून नमूद केले.
दर्जेदार कलाकृती रसिकांना पाहण्यास मिळणार : यंदाच्या महोत्सवातील सर्वच कलाकृती दर्जेदार असून, त्याचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असं आवाहन फेस्टिव्हल डिरेक्टर संतोष पाठारे यांनी केलं. महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. आंद्रागोजी' चित्रपटाने महोत्सवाची शानदार सुरुवात झाली. 18 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या सात दिवसांच्या महोत्सवात विविध आशियाई देशांतील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवा दरम्यान अनेक दर्जेदार कलाकृती रसिकांना पाहण्यास मिळणार आहेत.
हेही वाचा :
1 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली श्री काळाराम मंदिराची स्वच्छता, पाहा व्हिडिओ
2 'अटल सेतू'मुळं फेरी बोट चालकांना बसणार फटका? जाणून घ्या कारण
3 भारताला सर्वोच्च स्थानावर नेण्याचे बळ मिळो; गोदामाईच्या साक्षीनं पंतप्रधान मोदींचा संकल्प