मुंबई - भाषेचा विकास हा परिसंवादातून पुढे जातो. त्यामुळे भाषा विकासात जे योगदान देतात त्यांचा मराठी भाषा दिनी पुरस्कार देऊन सत्कार केला जातो, हे महत्वाचे काम आहे, असे मत ग्रंथाली प्रकाशनचे दिनकर गांगल यांनी व्यक्त केले. ते मराठी भाषा गौरव सोहळा पुरस्कार कार्यक्रमात बोलत होते.
मराठी अभ्यासकेंद्र आणि मराठी भाषा वाङ्मय मंडळ तसेच वि. ग. वझे महाविद्यालय मुलुंड यांच्या संयुक्त उपक्रमाने मराठी भाषा गौरव सोहळा पुरस्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी गांगल म्हणाले, मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थेला आणि मराठीसाठी काम करणाऱ्या शिक्षकाला पुरस्कार देणे, ही खूप अपूर्व गोष्ट आहे. ते शांताराम दातार आणि जयवंत चुनेकर यांच्या नावाने दिले जावे, हे आणखी वैशिष्ट्य आहे. परिसंवादाने मराठी भाषा पुढे जाईल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.