मुंबई Dharavi Redevelopment Project : 'धारावी बचाव' अशा घोषणा देत आज शिवसेना उद्धव ठाकरे गट धारावीत मोठा मोर्चा काढणार आहे. स्वतः उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाचं नेतृत्व करण्याची घोषणा केलीय. त्यामुळं शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या मोर्चाची जय्यत तयारी केलीय. धारावीत या मोर्च्याचे मोठ्या प्रमाणात बॅनर, पोस्टर्स लावण्यात आले आहेत. हा मोर्चा धारावीच्या टी जंक्शनपासून सुरु होणार असून, याचा शेवट अदानी कार्यालयावर होणार आहे. या मोर्चामध्ये दीड ते दोन लाख लोक सहभागी होणार असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. यावर आता संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून मोर्चा रद्द करण्यासाठी दिल्लीतून दबाव असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय.
काय म्हणाले संजय राऊत : मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, "हा मोर्चा शिवसेनेचा आहे. हा मोर्चा फक्त धारावी वाचवण्यासाठी नाही तर पुनर्विकासाच्या नावाखाली टीडीआर घोटाळा झाला आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी देखील आहे. धारावीत सध्या मोठी गुजराती लॉबी आहे. धारावीतील गरीब लोकांना घर मिळायला हवीत. हाच आमचा उद्देश आहे. ते जिथं राहतात तिथं त्यांना व्यवसायासाठी जागा मिळायला हवी. धारावी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी एवढंच लोकांना माहिती आहे. पण, इथं मोठंमोठे लघू उद्योग चालतात. त्यातून हजारो लोकांना रोजगार मिळालाय. मात्र, अदानी प्रकल्पात या उद्योगांना कुठं जागा देणार हे सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळं ते जिथं राहतात तिथं त्यांना व्यवसायासाठी जागा मिळायला हवी."
भारतातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा : पुढं बोलताना खासदार राऊत म्हणाले की, "आता मोठ्या प्रमाणात इथं ड्रग्स उतरत आहेत. यांना इथं ड्रग्सचा वापर करायचा आहे का? भारतातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा इथं होणार आहे. हा मोर्चा निघू नये, अदानीविरोधात मोर्चा निघू नये यासाठी दिल्लीतून दबाव होता. तो दबाव झुगारून आम्ही मोर्चा काढतोय. फडणवीस काय म्हणतात याकडं लक्ष देण्याची गरज नाही. टीडीआर घोटाळा बाहेर आला की, भाजपाचे हात यात किती बरबटलेले आहेत ते समोर येईल. दिल्लीच्या मदतीनं धारावी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वात मोठा टीडीआर घोटाळा होणार आहे. 570 एकरची जमीन भाजपाचे जावई अदानी यांच्या हातात दिली जातं आहे. मुंबई विकण्याची तयारी हे करत आहेत. मात्र, ते आम्ही होऊ देणार नाही", असं म्हणत राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केलाय.
हेही वाचा :