मुंबई - आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी असलेल्या धारावीभोवती कोरोना विषाणूची घट्ट आवळलेली साखळी आता काही प्रमाणात सैल झाली आहे. मुंबईचे मुख्य 'हॉटस्पॉट' ठरत असलेल्या धारावीत करोनाला रोखण्यात यंत्रणा यशस्वी ठरल्याचे रोज येणाऱ्या रुग्णांच्या आकड्यावरून सिद्ध झाले आहे. गेल्या आठवडाभरापासून नवीन कोरोनाबाधित रुग्ण मिळण्याची संख्या कमी होत आहे. आता आठवड्यापासून जेथे दिवसभरात 100 ते 150 रुग्ण सापडायचे तेथे आता 10 ते 50 रुग्ण नवीन रुग्ण सापडत आहेत. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
धारावीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथे 'मिशन धारावी' ही योजना राबवण्यास सुरुवात केली होती. पालिकेने घरोघरी जाऊन लाखो रहिवाशांची केलेली तपासणी आणि दोन किमीपेक्षा जास्त क्षेत्रफळातील वस्तीत जाऊन केलेले निर्जंतुकीकरण आणि प्रभावी क्वारंटाईन यामुळे धारावीतील कोरोनाच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळणे शक्य झाले आहे. त्यामुळे मिशन धारावी ही यशस्वी होत असल्याचे जी नार्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.
धारावीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने 'मिशन धारावी' सुरू केले होते. ते आजही सुरू असून याचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. पालिकेने हाती घेतलेल्या मिशन धारावी'मध्ये 200 डॉक्टर्स, 300 परिचारिका, 40 इंजिनीअर्स, 300 कर्मचारी आणि 3 हजार 600 कामगार मिळून विशेष टीम अहोरात्र काम करीत आहे. पालिकेची ही टीम संशयित रुग्णांची घरोघरी जाऊन तपासणी करणे, रुग्ण सापडल्यास त्याला रुग्णालयात हलवणे, त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना क्वारंन्टाईन करणे , क्वारंन्टाईन सेंटर्समधील खाटांची उभारणी करणे, सील करण्यात आलेल्या तसेच इतर ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करणे अशी कामे करत आहे. या शिवाय रुग्ण आढळल्यानंतर धारावीतील जाहीर केलेल्या कंटेनमेंट झोनमधील लोकांसाठी तयार जेवण, किराणा आणि औषधांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
आतापर्यंत दरदिवशी दोन वेळचे जेवणाचे पॅकेट्स असे 3 लाखांहून जास्त तयार जेवणाचे पॅकेट्स तर 20 हजार किराणा मालाचे पॅकेट्स वितरित करण्यात आले आहेत. वेळीच होणाऱ्या तपासणीमुळे कोरोनाचा प्रसार रोखता येणे शक्य झाले आहे. आतापर्यंत 4 लाखापेक्षा जास्त लोकांचे स्क्रिनिंग झाले आहे. धारावीमध्येही फिव्हर क्लिनिक आणि मिशन धारावीच्या माध्यमातून आतापर्यंत दीड लाख व्यक्तींची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत 2 हजार 70 जणांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. वेळीच होणाऱ्या तपासणीमुळे कोरोनाचा प्रसार रोखता येणे शक्य झाले आहे. मिशन धारावी योजनेत धारावीत सर्वाधिक 34 कंटेन्मेंट झोन असून आतापर्यंत 82 हजारांहून जास्त लोकांनां घर आणि क्वारंन्टाईन सेन्टरमध्ये क्वारंन्टाईन करण्यात आले आहे.
धारावीत एकूण 4 हजार 500 क्वारंन्टाईन सेंटर्स असून त्यात 2 हजार 70 कोरोना रुग्णांवरही उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. राजीव गांधी स्पोर्ट्स संकुलात तयार करण्यात आलेल्या सेंटरमध्ये रुग्णांना क्वारंन्टाईन करण्यात येते. 14 दिवसांच्या क्वारंन्टाईननंतर लक्षणे न आढळल्यामुळे घरी पाठवण्यात येत आहे. लोकांना घरी क्वारंन्टाईन केल्यामुळे क्वारंन्टाईनचे नियम काटेकोरपणे पाळले जात नाहीत. त्यामुळे आता होम क्वारंन्टाईनऐवजी संस्थांत्मक क्वारंन्टाईनवर भर देण्यात आला आहे. याप्रकारे धारावीत सध्या रुग्ण कमी सापडत आहेत तर, पालिका याप्रकारे कार्यरत आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये काही दिवसांपूर्वी करोनाची बाधा झालेले रुग्ण मोठ्या संख्येने सापडत होते. मात्र, गेल्या आठवड्यांपासून रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे. ही आम्हा धारावीकरांसाठी आनंदाची बाब आहे. रुग्णसेवेसाठी सज्ज झालेले पालिका रुग्णालय आणि खासगी रुग्णालय, ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेऊन केलेले उपचार, करोनाबाधितांच्या संपर्कातील संशयितांचे विलगीकरण यामुळे धारावीमधील करोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात पालिकेला यश आले आहे. कोरोनाचा झालेला प्रादुर्भाव सर्वांसाठीच चिंतेचा विषय होता. पण परिस्थिती आता हळूहळू सामान्य होत चालली आहे.
पालिकेने खासगी डॉक्टरांचा सहभाग असलेली पथके स्थापन करून घरोघरी जाऊन रहिवाशांची तपासणी मोहीम हाती घेतली यामुळे खूप फरक पडला. आता आम्ही काही प्रमाणात मोकळा श्वास घेऊ शकतो. मागील अनेक वर्षांपासून धारावीतील उद्योगधंद्यांमध्ये परप्रांतीय श्रमिकांचा सहभाग मोठा होता. हे श्रमिक गावी गेल्यामुळे येथे गर्दी कमी झाली आहे. याचा ही फायदा झाला असे येथील स्थानिक रहिवाशी सांगतात.