मुंबई - धारावी येथील अप्पर वैतरणा प्रमुख जलजोडणीचे काम महापालिका शनिवारी हाती घेणार आहे. रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत हे काम चालणार आहे. त्यामुळे धारावी आणि वांद्रे पूर्व भागाचा पाणी पुरवठा शनिवारी आणि रविवारी खंडीत केला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा- राऊतांच्या 'त्या' वक्तव्याचे राज्यभरात पडसाद; उदयनराजे समर्थक रस्त्यावर
धारावी येथील 1500 मी.मी. व्यासाची जलवाहिनी, 1450 मि.मी. व्यासाची अप्पर वैतरणा प्रमुख जलवाहिनीच्या जलजोडणीचे काम केले जाणार आहे. शनिवारी दुपारी 12 वाजल्यापासून कामाला सुरुवात होईल. तब्बल 2 दिवस काम चालणार असून शनिवारी 4 ते रविवारी 12 वाजेपर्यंत धारावी मेन रोड, गणेश मंदीर रोड, ए. के. जी. नगर रोड, कुंभारवाडा, संत गोरा कुंभार रोड आणि दिलीप कदम मार्ग, प्रेम नगर, नाईक नगर, 60 फिट रोड, जस्मिल मिल रोड, माटुंगा लेबर कॅम्प, 90 फिट रोड, एम. जी. रोड, धारावी लूप रोड, संत रोहिदास रोड भाग आणि वांद्रे टर्मिनस भागात 24 तासासाठी पाणी पुरवठा खंडीत केला जाणार आहे.
नागरिकांचे यामुळे हाल होणार आहेत. दरम्यान, नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच्या दिवशी पाण्याचा साठा करावा. तसेच काटकसरीने पाणी वापरावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जलविभागाने केले आहे.