मुंबई - भाजपला राज्यात आपली सत्ता येणार असल्याचा विश्वास असताना देखील मोदी व अमित शाह यांच्या 10 ते 20 सभा आणि मुख्यमंत्र्यांच्या 100 सभा कशासाठी होत आहेत? असा सवाल धारावी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला.
मुंबईकर जनता व काँग्रेस कार्यकर्ते गेल्या सहा महिन्यांपासून राहुल गांधी यांना बोलवत आहे. त्यामुळेच राहुल गांधी रविवारी मुंबईत येत असल्याचे त्या म्हणाल्या.
हे वाचलं का? - भाजप सत्तेत येण्यास राष्ट्रवादीचा चोंबडेपणा कारणीभूत; 'सामना'तून शरद पवारांवर खरमरीत टीका
निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सर्वत्र सुरू आहे. त्यामध्येच मुंबईतील 36 मतदारसंघांपैकी धारावी मतदारसंघ हा सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. कारण या ठिकाणी 2014 साली मोदी सरकारची लाट असताना देखील काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या होत्या. त्या सातत्याने गेली १५ वर्षे या ठिकाणच्या आमदार राहिलेल्या आहेत. मात्र, धारावीच्या प्रमुख समस्या अद्यापही सुटलेल्या नाही. त्यामुळे शिवसेना वंचित आघाडीने देखील धारावी मतदारसंघात धारावी पुनर्वसन रोजगार अशी प्रमुख मागणी घेऊन तगडे उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी या मतदारसंघात मोठी चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे.
हे वाचलं का? - विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक होणार यात मुळीच शंका नाही - प्रकाश आंबेडकर
राहुल गांधी रविवारी प्रचारासाठी मुंबईत चांदिवली व धारावी येथे सभा घेणार आहेत. धारावी मतदारसंघातील माजी खासदार एकनाथ गायकवाड हे सध्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांचा प्रचार व्हावा यासाठी राहुल धारावी मतदारसंघात येत असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव उद्या राहुल धारावीत येणार आहेत.
गेल्या ५ वर्षात केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता होती. त्यांनी कुठलीही कामे केली नाही. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली, धारावीसारख्या मतदारसंघातील सर्व लघुउद्योग बंद पडले. पीएमसी बँक घोटाळा झाला. यासारख्या अनेक प्रश्नांमुळे जनता त्यांच्यावर नाराज आहे. काँग्रेसने शक्य तेवढी सर्व काम केली. भाजप राबवत असलेल्या योजना काँग्रेसने सुरू केलेल्या होत्या. ते आता भाजप चालवत आहेत, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
गेली १५ वर्ष धारावीत सातत्याने काम करत आहे. शक्य तेवढी काँग्रेसच्या माध्यमातून सर्व कामे केली. धारावीकरांच्या सुखदुःखात सहभागी होते. मी धारावीतील नागरिकांच्या कुटुंबातील एक व्यक्ती आहे. धारावीकरांचे आणि आमचे एक घट्ट नात आहे. काहीच कामे केली नाही, असे कोणीही सांगावे, असे वर्षा म्हणाल्या.
धारावी पुनर्वसन व इतर जे प्रश्न आहे त्याबाबत मुख्यमंत्री व प्रकाश मेहता यांना वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र, ते भेट देण्यास नकार देतात. त्यामुळे धारावीच्या विकासाची काम रखडलेली आहेत, असा आरोप वर्षा यांनी मुख्यमंत्री व प्रकाश मेहता यांच्यावर केला आहे. तसेच धारावीकरांच्या विश्वासामुळे काँग्रेस चौथ्यांदा देखील धारावी मतदारसंघात निवडून येईल, असा विश्वास वर्षा यांनी यावेळी व्यक्त केला.