मुंबई - ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे. या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी येथे सुरू असलेल्या नियोजनाची, तसेच इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाची सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज पाहाणी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक मार्च २०२३ च्या अगोदर नागरिकांसाठी खुले केले जाईल. स्मारकाचा लोकार्पण सोहोळा २०२३ साली केला जाईल. यासाठीची तयारी सुरू असल्याची माहिती मुंडे यांनी दिली. आंबेडकर स्मारकाच्या तळमजल्याचे काम पूर्ण झाले असून, मुख्य प्रवेशद्वार आमच्या सूचनेनंतर साडेसहा फुटावर नेण्यात आले आहे. इतर कामे ही वेगात असल्याची माहितीही मुंडे यांनी दिली.
मुंडे यांनी आंबेडकर स्मारक समितीच्या मुख्य पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेऊन एकूणच लोकार्पण सोहोळ्यापूर्वी स्मारकाच्या बांधकामाचा कोणता टप्पा सुरू आहे, याचाही आढावा घेतला. हे सर्व काम दोन महिने अगोदर म्हणजेच, मार्च २०२३ पूर्वी झाले पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तर, महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आंबेडकरी जनतेनी कोरोनाचा धोका लक्षात घेऊन चैत्यभूमी येथे गर्दी करू नये, असे आवाहनही मुंडे यांनी केले.
चैत्यभूमीच्या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण
चैत्यभूमी येथील कार्यक्रमाचे राज्यातील प्रमुख वाहिन्यांसोबतच सरकारी वाहिन्या, तसेच विविध माध्यमांमधून लाइव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. विशेष म्हणजे, हे लाइव्ह आणि त्यासाठीचे तंत्रज्ञान राम मंदिराच्या पायाभरणी दरम्यान वापरण्यात आले होते. त्या पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून चैत्यभूमी येथील कार्यक्रम लाइव्ह दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे, राज्यातील आणि देशातील प्रत्येक आंबेडकरी अनुयायांना आपल्या घरीच हा कार्यक्रम पाहाता येईल, अशी सोय करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका खर्च करणार असली, तरी आवश्यकता पडल्यास सामाजिक न्याय विभागसुद्धा यासाठीचा निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली.
हेही वाचा- कोण म्हणालं ?, छत्री असूनही पावसात भिजल्याचं भांडवल केलं जातंच की...!