मुंबई : धनंजय मुंडे यांच्या कारला 3 जानेवारी रोजी मध्यरात्री परळी येथे अपघात झाला होता. त्या अपघातात त्यांच्या छातीला आणि पाठीला मार लागला होता. त्यानंतर तातडीने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सोळा दिवस उपचार घेतल्यानंतर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घेण्याचे सांगितले आहे.
कार्यकर्त्यांनी भेटायला येऊ नये : धनंजय मुंडे मुंबईतील निवासस्थानी काही दिवस विश्रांती घेऊन परळीला लवकरच जाणार आहेत. सध्या ते काही दिवस मुंबईतच विश्रांती घेणार आहेत. डॉक्टरांनी काही नियमावली सांगितली असल्याने त्यांना मुंबईत विश्रांती घेयची आहे. त्यानंतर ते सर्वांना भेटून पुन्हा आपल्या कामाला लागतील. परंतु, डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितली असल्याने पुढील काही दिवस सहकारी-कार्यकर्त्यांनी भेटायला येऊ नये, असे आवाहन मुंडे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.
विचारपूस करून काळजी व्यक्त केली : राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, मंत्रिमंडळातील आजी-माजी सदस्य, खासदार, आमदार यांच्यासह विविध क्षेत्रातील लोकांसह कार्यकर्त्यांनी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात धनंजय मुंडे यांना भेटून त्यांची विचारपूस केली आहे. तसेच, या काळात उपचार केलेल्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस, रुग्णालयातील कर्मचारी, विचारपूस करून काळजी व्यक्त केलेले सर्व मान्यवर तसेच समर्थकांचेही धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहेत.
असा झाला अपघात : परळी शहरातील काही नागरिकांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेतल्यानंतर मध्यरात्री माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाहनाचा अपघात झाला. दरम्यान, चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्यांची गाडी मौलाना आझाद चौकावर आदळली. या अपघातामध्ये मुंडे यांच्या बीएमडब्ल्यू कारला पुढच्या भागाला मोठे नुकसान झाले. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांच्या घरी जाऊन तपासणी केली. त्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या छातीमध्ये दोन ठिकाणी फ्रॅक्चर असल्याचे दिसून आले.
राजकीय नेत्यांच्या अपघातांत वाढ : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील आमदारांच्या अपघातात वाढ झाली आहे. रस्ते अपघातांचा यामध्ये मोठा समावेश आहे. माजी मंत्री बच्चू कडू, जयकुमार गोरे, धनंजय मुंडे, आमदार भरत गोगावले, योगेश कदम यांच्या वाहनांचा अपघात झाला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. सध्या वाढत्या लोकप्रतिनिधींच्या अपघातावर राजकीय क्षेत्रातून प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अपघात टाळण्यासाठी रात्रीचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा : मॉडेलचा फोटो व्हायरल करणे पडले महागात! मुंबई पोलिसांकडून अभिनेत्री राखी सावंतला अटक