मुंबई - तौक्ते चक्रीवादळाने कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागात मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस 2 दिवसांचा दौरा करणार आहेत. बुधवारी आणि गुरुवारी त्यांचा पाहणी दौरा असणार आहे. बुधवारी ते रायगड तर गुरुवारी रत्नागिरी जिल्ह्याला भेट देणार आहे, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदीही येत्या दोन दिवसांत नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारने भक्कमपणे जनतेच्या पाठीशी उभे रहायला हवे - फडणवीस
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे नुकसानग्रस्तांच्या मदतीची मागणी केली आहे. गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तेव्हाही फडणवीसांनी कोकण दौरा करत नुकसानाची पाहणी केली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोकणाचा दौरा केला होता. तेव्हा ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांसाठी मदतीची घोषणा केली होती. मात्र, 'गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळ आल्यावर राज्य सरकारने जी मदत जाहीर केली, ती एकतर तोकडी होती आणि ती सुद्धा मिळाली नाही. तौक्ते वादळानंतर नुकसानीचा अंदाज घेऊन राज्य सरकारने भक्कमपणे जनतेच्या पाठीशी उभे रहायला हवे!', असे ट्वीट करत त्यांनी राज्य सरकारकडे नुकसानग्रस्तांच्या मदत देण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - 'तौक्ते'मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3, 375 हेक्टर क्षेत्रावरील बागायतीचे नुकसान
तौक्ते चक्रीवादळाचा या भागाला सर्वाधिक फटका
तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग,रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहतुकीवर याचा परिणाम झाला असून महामार्ग, मुख्य रस्ते आणि रेल्वे सेवा बंद आहे. वादळामुळे जवळपास 80 टक्के विजेचे खांब कोसळले आहेत. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मोबाईल टॉवरही कोसळले आहेत. त्यामुळे मोबाईल सेवाही विस्कळीत झाली आहे. अशावेळी प्रशासनाने आधीच खबरदारी घेत कोरोना रुग्णांसाठी योग्य उपाययोजना केल्या आहेत.