मुंबई- माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील सेंट जॉर्ज, जीटी आणि नागर रुग्णालयांना भेट दिली. डॉक्टर्स, नर्सेस, तैनात पोलीस कर्मचारी यांची आस्थेने विचारपूस करुन त्यांच्या खंबीर लढ्याचा गौरव केला करून त्यांचे आभार मानले.
हेही वाचा- COVID-19: मुदत संपलेली वाहनांची कागदपत्रे वैध समजली जाणार - केंद्रीय वाहतूक मंत्रालय
या तिन्ही रुग्णालयाला भेट देऊन फडणवीस यांनी तेथील डॉक्टरांकडून कोरोनाची सद्यस्थिती, उपचार, डॉक्टर्स, नर्सेस इत्यादींना असलेल्या सुविधांची माहिती घेतली. सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांनी अधीक्षक डॉ.आकाश खोब्रागडे आणि कोविड व्यवस्थापन प्रमुख डॉ.मधुकर गायकवाड यांच्याशी चर्चा केली. जीटी हॉस्पीटलमध्ये डॉ.अनंत शिंगारे आणि डॉ.देशपांडे यांच्याशी त्यांनी चर्चा करुन माहिती जाणून घेतली. संपूर्ण देशात आज डॉक्टर्स, नर्सेस आणि सारेच आरोग्य कर्मचारी जोखीम पत्कारुन अतिशय चांगले काम करीत आहेत. समाजाची ही फार मोठी सेवा आहे. त्यांचे हे काम संपूर्ण देश कायम स्मरणात ठेवेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
नायर रुग्णालयात डॉ.जोशी यांच्याशीही कोरोना प्रतिबंधात्मक उपायांबाबत फडणवीस यांनी सविस्तर चर्चा केली. सध्याची रुग्णस्थिती, उपचारांची दिशा, रुग्णालयातील व्यवस्था इत्यादींबाबत ही चर्चा होती. रुग्णालयाची सुरक्षा आणि होणार्या गर्दीचे नियंत्रण यात समतोल साधत पोलीस बंधू करीत असलेल्या बहुमूल्य कामगिरीसाठी त्यांनी पोलिसांना सुद्धा धन्यवाद दिले.