मुंबई - राज्यात सध्या जागतिक महामारी असलेल्या कोरोना विषाणूने थैमान घालायला सुरुवात केली आहे. त्यातच डायलेसिस, केमोथेरपी यासारखे उपचार घेणाऱ्या रुग्णांना कोरोना चाचणी केल्याशिवाय उपचार मिळेनासे झालेत. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाची चाचणी सक्तीची करायला हरकत नाही. पण, त्या चाचणीचे अहवाल लगेच मिळण्यासाठी रॅपिड टेस्टची परवानगी द्यायला हवी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडे केली आहे.
फडणवीस म्हणाले, राज्यात अनेक रुग्णालये बंद झालेली असल्याने डायलेसिस, केमोथेरपी या सारखे उपचार घेणाऱ्या रुग्णांची सध्या गैरसोय होत आहे. या रुग्णांना कुठे उपचार घ्यावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना चाचणीचे अहवाल यायला विलंब होत असेल आणि त्याअभावी ज्यांना नियमित अत्यावश्यक उपचार मिळत नसतील, तर त्यातून आरोग्याच्या नवीन समस्या उद्भवू शकतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
गरोदर महिलांसंदर्भात सुद्धा अशा कोरोना संबंधिक चाचण्यांच्या सक्तीकरणामुळे मूळ समस्येवरचा उपचारावर विलंब होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी विनंती करणारे ट्विट त्यांनी केले आहे.