मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही भाजप आणि शिवसेनेमध्ये विधान परिषदेच्या नियुक्तीवरून वादंग होत आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. भाजप आणि सेनेत राज्यपालांच्या भूमिकेवरून संघर्ष पेटला असताना झालेली फडणवीसांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. तसेच यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 27 मेपूर्वी विधिमंडळाच्या विधानसभा किंवा विधान परिषद या सभागृहाचे सदस्य होणे अनिवार्य आहे. अन्यथा ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची वेळ येऊ शकते. कोरोनाच्या प्रादूर्भावाच्या काळात परिषदेच्या निवडणुकांची घोषणा झालेली नाही. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाने ठाकरे यांच्या नावाची शिफारस राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या सदस्यपदासाठी केली आहे. मात्र, याबाबत राज्यपाल कोश्यारी यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर ट्विटच्या माध्यमाने तीव्र शब्दांत टीका केली. त्याला भाजपचे आशिष शेलार यांनीही परखड भाषेत प्रत्युत्तर ही दिले आहे. आता याच संघर्षाच्या दरम्यान भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात राज्यपाल यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.