मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक हिरेन मनसुखानी याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ठाण्यातील रेती बंदर खाडीजवळ हा मृतदेह आढळून आला. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पियो गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात सचिन वझे हे अधिकारी तपास करत आहेत. वझे यांनी हिरेन मनसुख यांना जबानी घेण्यासाठी सोबत घेतले होते व त्यानंतर काही दिवसातच रेतीबंदर जवळ हिरेन मनसुख यांचा मृतदेह आढळून आला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वझे या अधिकाऱ्यावर 201 च्या अंतर्गत अटकेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे. फडणवीसांच्या या मागणीवर मात्र, वझेंनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
ख्वाजा युनूस पोलीस कोठडीत मृत्यू संदर्भात निलंबन
2 डिसेंबर 2002मध्ये मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या बॉम्ब ब्लास्ट संदर्भात परभणी येथून अटक करण्यात आलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियर ख्वाजा युनूसच्या पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी सचिन वझेंना निलंबित करण्यात आले होते. 2 डिसेंबर 2002ला मुंबईतील घाटकोपर येथे घडलेल्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी 27 वर्षीय ख्वाजा युनूस यास अटक करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात पोलीस तपासासाठी औरंगाबाद येथे आरोपी ख्वाजा युनुस यास वाहनाने घेऊन जात असताना पोलीस वाहनाचा अपघात झाला होता. पोलीस रेकॉर्डनुसार, ख्वाजा युनूस अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता. त्यानंतर 2003पासून त्यांच्यावर याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ख्वाजा युनूस याच्या पोलीस कोठडीतील मृत्यू संदर्भात १४ जणांना निलंबित करण्यात आले होते. यामध्ये ३ मार्च २००४ रोजी सचिन वझे या अधिकाऱ्याला ही निलंबित करण्यात आले होते . यानंतर वझे या अधिकाऱ्याने पुन्हा पोलीस सेवेत येण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, त्यांचे प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे त्यांनी त्यांच्या पोलीस सेवेचा राजीनामा दिला. मात्र, हा राजीनामा त्यावेळेस फेटाळण्यात आला होता.
२००८ मध्ये शिवसेने पक्षप्रवेश
यानंतर २००८ मध्ये शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सचिन वझे यांनी जाहीररीत्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर वेगवेगळ्या पदांवर त्यांनी कामसुद्धा केले होते. जून २०२० मध्ये वझे यांना पुन्हा पोलीस सेवेत सामावून घेण्यात आल्यानंतर सुरुवातीला त्यांची बदली पोलीस हत्यारी विभागात करण्यात आली होती . त्यानंतर सचिन वझे यांची वर्णी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचमधील सी आय यु विभागात करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडे टीआरपी घोटाळ्यासंदर्भातील तपास देण्यात आला होता. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूसंदर्भात मुंबई पोलिसांकडून तपास केला जात असताना केंद्र सरकारकडून सीबीआय चौकशी सुरू करण्यात आल्यामुळे या संदर्भात माध्यमांकडून मुंबई पोलिसांवर प्रचंड टीका होत होती. या दरम्यानच सचिन वझे या अधिकाऱ्याकडे टीआरपी घोटाळ्यासंदर्भातील तपास देण्यात आल्यानंतर या याप्रकरणी मोठी कारवाई करत ३० पेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आलेली आहे.
कार कर्ज घोटाळा
प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांच्या कंपनीच्या मार्फत देशभरातील सेलिब्रिटी व व्यावसायिकांना कार कर्जाच्या माध्यमातून शंभर कोटी रुपयांचा चुना लावण्याच्या संदर्भातही सचिन वझे यांनी कॉमेडियन कपिल शर्मा , भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू, यांच्यासह इतर व्यावसायिकांची जबानी घेत दिलीप छाब्रिया यास अटक केली होती.