मुंबई- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांना कोरोना झाल्यामुळे १५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान ते होम क्वारंटाईन होते. मात्र, या काळात त्यांनी शेतकरी आंदोलन मुद्दावर सेलिब्रिटींच्या ट्विटवर केलेल्या वक्तव्याचा खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. परंतु अनिल देशमुख होम क्वारंटाईन असताना पत्रकार परिषद कशी काय घेऊ शकतात? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना विचारला आहे. याबाबत फडणवीस यांनी पवारांना ट्विट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यास नकार दिला आहे. 15 ते 27 फेब्रुवारी दरम्यान देशमुख हे क्वारंटाईन होते. त्यामुळे देशमुख कोणालाही भेटले नाहीत, असे पवारांनी म्हटले. याबाबतचे स्पष्टीकरण त्यांनी नुकतेच दिल्लीत दिले. मात्र, यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना प्रश्न केला आहे.
काय म्हणाले फडणवीस?-
'शरद पवार म्हणाले की 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत गृहमंत्री अनिल देशमुख क्वारंटाईन होते. परंतु प्रत्यक्षात सुरक्षा रक्षक आणि मीडियासमवेत देशमुख पत्रकार परिषद घेताना दिसले!', असे फडणवीसांनी म्हटले आहे. याबाबतचे ट्विटही त्यांनी केले आहे. तसेच, अनिल देशमुखांच्या पत्रकार परिषदेचे ट्विटही रिट्विट केले आहे.
देशमुखांचा राजीनामा का नाही? -
'अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार नाही. कारण देशमुखांनी सचिन वाझेंना महिना 100 कोटी वसुलीचे आदेश दिले होते, असे आरोप माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांनी केले आहेत. पण या आरोपात काही तथ्य नाही. त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे दावा खोटा, तर चौकशी कसली? कारण, देशमुख कोरोनामुळे 5 ते 15 फेब्रुवारी दरम्यान रूग्णालयात होते. तर, 15 ते 27 फेब्रुवारी दरम्यान ते क्वारंटाईन होते. याची कागदपत्रेही आहेत. असं असताना लक्ष विचलित करण्यासाठी केलेले हे आरोप आहेत', असे शरद पवारांनी म्हटले आहे.