मुंबई - पालिकेच्या नायर दंत रुग्णालयाने याबाबत नवीन तोडगा काढला असून नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. यासाठी नवीन प्रयोगशाला उभारली जाणार आहे. यामध्ये रुग्णाच्या डमीवर म्हणजेच त्याच्या अर्धकृती प्रतिकृतीवर दंतोपचार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञान व प्रशिक्षण मिळावे म्हणून सिम्युलेटर दंत प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे.
काय असणार आहे विशेष? - या प्रयोगशाळेत इलेक्ट्रॉनिक खुर्च्यामध्ये दंत उपचारासाठी लागणारे सर्व साहित्य असणार आहे. या खुर्चीत माणसाच्या तोंडातील दातांची रचना असलेली प्रतिकृती बसवून दिली जाईल. विद्यार्थ्यांना रुग्णाच्या प्रतिकृतीमध्ये दात काढणे, दात बसवणे, दाताच्या मुळाच्या वाहिन्यांच्या मार्ग बदलणे, दातांवर आवरण बसवणे, हिरड्यांची सूज अशा दातांबद्दल असलेल्या विविध तक्रारींबाबत सराव करता येणार आहे. नवीन डिजिटल अद्यावत प्रयोगशाळा नायरच्या नवीन इमारतीत करण्यात येणार असून याचे काम सुरू झाले आहे. या प्रयोगशाळेत ५५ खुर्च्या असणार असून प्रत्येक खुर्चीवर दोन प्रतिकृती असतील. एका वेळी दोन विद्यार्थ्यांना दंतोपचाराचा सराव करणे शक्य होईल, असे नायर रुग्णालयाच्या अधिष्ठता, डॉक्टर नीलम आंद्राडे यांनी सांगितले आहे.
लवकर प्रावीण्य मिळवण्यासाठी मदत - बीडीएस विद्यार्थ्यांनी तिसऱ्या वर्षात रुग्णांवर उपचार करण्यास सुरूवात केल्यावर यात प्रावीण्य मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक वर्ष लागतात. परिणामी कमी कालावधीत या क्षेत्रातील विशेषज्ञ घडावेत या दृष्टीने पारंपरिक उपचार पद्धतीत बदल करून त्यास नवे स्वरूप देण्याचा हा प्रयत्न असणार आहे. विशेष म्हणजे या नवीन पद्धतीने अनेक विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होणार असून यामध्ये लवकरात लवकर प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांना त्याची मदत होणार आहे.