मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रसार व प्रादुर्भाव वाढतो आहे. काही जण मास्क घालणार नाही, म्हणतात. 'आरं बाबा, तुला काय कोरोना व्हायचा ब्यायचा न्हाय. पण, तुझ्यामुळं दुसऱ्याला व्हइल त्याचं काय', अशी मिश्किल टीका अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली. सभागृहात यावर एकच हशा पिकला.
मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मास्क न लावता आले होते. पत्रकारांनी त्यांना छेडले असता, ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असे प्रतिउत्तर दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विधान परिषदेत राज ठाकरे यांना नाव न घेता चिमटा काढला. त्यानंतर 'दरेकर असे कसे तुमचे जुने नेते', असा टोला लगावला. यानंतर सभागृहात हशा पिकला.
दरेकरांचे जॅकेट बघूनच कोरोना जवळ गेला नसेल
राज्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या सगळ्यांसाठीच तो चिंतेचा विषय आहे. विधान परिषदेत कोरोनाची सविस्तर आकडेवारी, राज्य सरकारकडून यासंदर्भात केलेल्या व केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाचे वरीष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेत दिली. यावेळी अजित पवारांनी दरेकरांवर टोलेबाजी केली. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानवपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोरोना झाला नसल्याचे सांगतानाच दरेकरांच्या जाकिटमुळेच त्यांना कोरोना झाला नसेल, असे अजित पवार म्हणताच हास्यकल्लोळ उडाला.
तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल
सध्या राज्यातला मृत्यूदर सुदैवाने घटला आहे. कोरोना झाला तर बऱ्याच लोकांना रुग्णालयात जावे देखील लागत नाही. बरेच जण घरच्या घरी औषधं घेऊन बरे होत आहेत. आज देखील आमच्या मंत्रिमंडळातील 7 ते 8 मंत्री आणि दोन्ही बाजूचे काही मान्यवर आमदार कोरोनाग्रस्त आहेत. मात्र, एका गोष्टीचे मला विशेष वाटते की मुख्यमंत्र्यांना, प्रवीण दरेकरांना आणि सभापती महोदयांना कोरोना नाही झाला. विधानसभेत मलाही झाला, फडणवीसांनाही झाला. तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळे तुम्हाला झाला नसेल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
नाहीतर माझ्या नावावर पावती फाडू नका
पण, तुम्हा तिघांनाही कोरोना होऊ नये अशा आमच्या शुभेच्छा असतील. नाहीतर उद्या कोरोना झाला तर म्हणतील तुझीच दृष्ट लागली आणि म्हणून कोरोना झाला, असे म्हणून माझ्या नावावर पावती फाडू नका, असे म्हणत अजित पवारांनी टोमणा मारला. तितक्यात मागून एका सदस्याने ‘प्रसाद लाड यांनी ज्यांना ज्यांना जॅकेट दिले, त्यांना कोरोना झाल्याचे म्हणताच अजित पवारांनी प्रसादने मलाही जॅकेट दिले होते, असे सांगितले.
हेही वाचा - केंद्र सरकारने महागाई कमी करून दिलासा द्यावा - उपमुख्यमंत्री