मुंबई : काळबादेवी येथे राहणाऱ्या एका इसमाला त्याच्या दुकानात काम करत असताना 12 मे रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास व्हाट्सॲप कॉल आला होता. व्हाट्सॲप कॉलवरून समोरील व्यक्तीने इसमाच्या पत्नीचे अश्लील फोटो पाठवून 14 हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी इसमाने एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ३५४, ३५४ (अ), ३८५, ५०६ सह ६६ (क), ६६ (ड), ६७ (अ) माहिती तंत्रज्ञान अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर पश्चिम बंगाल येथून आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक आरोपीचे नाव अब्दुल रहमान हसानुर मंडल, (वय ३१ वर्षे) असे आहे.
पैसे पाठवा अन्यथा फोटो व्हायरल : तक्रारदाराच्या पत्नीचे मॉर्फ केलेले अश्लिल फोटो व्हॉटस्ॲपद्वारे पाठवणाऱ्या आरोपीस पश्चिम बंगाल येथून अटक करण्यास पोलिसांना दीड महिना लागला. काळबादेवी परिसरात राहणाऱ्या तक्रारदाराला व्हॉटस्ॲपद्वारे पैसे पाठवा अन्यथा फोटो व्हायरल करण्यात येईल अशी धमकी देण्यात आली होती. ही घटना 12 मे रोजी घडली होती. आरोपीने फिर्यादीला +८८ ने सुरू होणाऱ्या १३ डिजीट मोबाईल क्रमांकावरून कॉल केला होता. नंतर समोरून बोलणाऱ्या इसमाने तक्रारदाराकडे 14 हजार रुपयांची मागणी केली.
व्हॉटस्ॲपवर पाठविले नग्न फोटो : त्यावर तक्रारदाराने आरोपीला तुम्हाला कशाचे पैसे हवे आहेत, अशी विचारणा केली. तेव्हा आरोपीने तक्रारदारांना व्हॉटस्ॲप पाहण्यास सांगितले. तक्रारदाराने व्हॉटस्ॲप पाहिले असता त्यांना त्यांच्या पत्नीचा चेहरा असलेले नग्न फोटो दिसून आले. त्यानंतर काही वेळाने तक्रारदारास पुन्हा त्याच क्रमांकावरून व्हॉटस्ॲप कॉल आला. "पैसे लवकर पाठव नाहीतर तुमच्या पत्नीचे फोटो कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्व लोकांना पाठवेन" अशी धमकी आरोपीने तक्रारदाराला दिली.
तक्रारदाराच्या मेव्हण्याला पाठवाला फोटो : तक्रारदाराने आलेल्या कॉलबाबत त्यांच्या पत्नीला माहिती सांगितली. तक्रारदार यांच्या पत्नीने मोबाईलवर पाठवलेले फोटो पाहिले. त्यानंतर आरोपीने पुन्हा व्हॉटस्ॲपद्वारे कॉल केला. तेव्हा आरोपीने तक्रारदाशी अश्लिल शब्दात बोलून पैसे पाठविण्याकरीता युपीआय आयडी पाठविल्याचे सांगितले. मात्र, तक्रारदाराने आरोपीला पैसे पाठवले नाही. त्यामुळे आरोपीने तक्रारदाराच्या मुलीची मैत्रीण तसेच मेव्हणे यांना व्हॉटस्ॲपद्वारे फोटो पाठविले. त्यानंतर घाबरलेल्या तक्रारदारासह त्यांच्या पत्नीने एल. टी. मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ३५४, ३५४ (अ), ३८५, ५०६ सह ६६ (क), ६६ (ड), ६७ (अ) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला.
26 जुलैपर्यंत पोलीस कोठडी : या गुन्ह्यातील तांत्रिक तपासात आरोपी हा बंगाव, नॉर्थ २४ परगाना, पश्चिम बंगाल या भागातील असल्याचे आढळून आले. एल. टी. मार्ग पोलीस ठाणे सायबर गुन्हे प्रकटीकरण पथकाने या गुन्ह्यातील आरोपीताचा शोध घेवून अब्दुल रहमान हसानुर मंडलला 16 जुलैला बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीकडुन गुन्ह्यात वापरलेला ०१ मोबाईल, सिमकार्ड हस्तगत करण्यात आले आहे. अटक आरोपीस न्यायालयाने 26 जुलैपर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली असुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शितल मुंढे करीत आहेत.