मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चैत्यभूमी हे नाव देण्यात यावे यासाठी अनेक आंदोलन करण्यात आली. आज देशभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी केली जात असताना दुसरीकडे या मागणीचा पुनरुच्चार आज पुन्हा एकदा करण्यात आला आहे. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया, आठवले गटाकडून ही मागणी करण्यात आली आहे.
या पूर्वीही आंदोलने : दादर रेल्वे स्थानकाचे नाव चैत्यभूमी करण्यात यावे या मागणीसाठी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वी आंदोलन करत मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी ही केली होती. त्यादरम्यान पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले होते. भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांच्या अनेक संघटनांनी या बाबत मागणी केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने सुद्धा ही मागणी लावून धरली आहे.
आंदोलन अधिक तीव्र करणार : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला अध्यक्ष अभया सोनावणे यांनी सांगितले आहे की, दादर रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चैत्यभूमी हे नाव देण्यासाठी अनेक वर्षापासून आम्ही मागणी करत आहोत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठका सुद्धा झाल्या तरी सुद्धा यावर अद्याप सकारात्मक निर्णय झालेला नाही. येणाऱ्या दिवसात याबाबत आंदोलन अधिक तीव्र करण्याचे तसेच गरज पडल्यास रस्त्यावर सुद्धा उतरले जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.
चैत्यभूमी ते इंदू मिल स्मारका दरम्यान संविधान पथ : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारले जात असून वर्षभरात हे काम पूर्ण होणार आहे. चैत्यभूमीला होणारा समुद्राच्या पाण्याचा धोका लक्षात घेऊन चैत्यभूमी ते इंदू मिल स्मारक यादरम्यान रस्ता निर्माण करण्यात यावा असा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठविण्यात आला आहे. स्मारक ते चैत्यभूमी हे ३५० मीटरचे अंतर असून येथे ३० मीटर रुंद रस्ता निर्माण केला जाणार आहे. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत दोन बैठकाही झाल्या असून ३० मीटर रुंद व ३५० मीटर लांब या रस्त्याला संविधान पथ म्हटले जाणार आहे.