मुंबई : विधान भवनाच्या आवारात 23 मार्च रोजी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला 'जोडे मारो' आंदोलन सत्ताधाऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते. अशा आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी गेल्या दोन दिवसांपासून विरोधकांनी लावून धरली होती. सरकारने काहीही निर्णय न घेतल्याने आज विरोधकांनी सभात्याग केला.
विरोधकांच्या मागणी वाटाण्याच्या अक्षता : या संदर्भात बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सभागृहात म्हणाले की, विधानसभेत विधान भवनाच्या आवारात काही सदस्यांद्वारे जे अप्रिय वर्तन घडले आहे. त्या संदर्भात सभागृहात विरोधी पक्षनेते व काही सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला होता. त्या अनुषंगाने संबंधित जबाबदार सदस्यांना मी लेखी पत्राद्वारे सक्त ताकीद देणार आहे. तसेच, सभागृहात देश व राज्य पातळीवरील संवैधानिक पदे धारण करणाऱ्या काही मान्यवरांबद्दल सभागृहात अक्षय प्रांत व्यक्तीसंबंधित सदस्यांनादेखील मी आवश्यक अशाच प्रकारे लेखी ताकीद देणार असल्याचेही अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.
मार्गदर्शक प्रणाली तयार करणार : या संदर्भात बोलताना विधानसभा अध्यक्ष म्हणाले की, माझ्या असे निदर्शनास आले आहे की, अलीकडच्या काळात सभागृहाबाहेर पायऱ्यांवर तसेच विधान भवनाच्या बाहेर काही सदस्य आंदोलन करतात व त्यामधून काही अत्यंत आप्रिय घटना घडत असतात. याचे पडसाद सभागृहात आणि सभागृहाबाहेर उमटतात. अशा घटनांची दखल माध्यमेदेखील घेत असतात, त्यामुळे सदस्यांच्या वर्तनाबद्दल जनमानसात चुकीचे संदेश जातो.
सभागृहाची प्रतिमा मलीन होते : सभागृहाची प्रतिमा मलीन होते, याबाबत आपण सर्वांनीच विचार करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सभागृहांमध्ये तसेच सभागृहाच्या बाहेर विधानसभेचे सदस्य म्हणून कशी वर्तणूक ठेवावी याचे आपल्याला चिंतन करावे लागेल. कारण सभागृह ही लोकशाहीची मंदिरे असून, लोकांच्या आशा-आकांक्षांचे पवित्र प्रतीक आहे.
विधानसभा अध्यक्षांची सर्व सदस्यांना मार्गदर्शक मानके : विधानसभेचे सदस्य म्हणून आपली वर्तणूक कशी असावी, सभागृहातील वर्तन कसे असावे याबद्दल सदस्यांसाठी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अर्थातच सभागृहातील व सभागृहाबाहेरील सदस्यांच्या वर्तणूक वर्तनाबाबतची मानके सदस्यांना अवगत करण्यात येतील. त्यानुसार येणाऱ्या काळात जनमानसातील प्रतिष्ठेची जपणूक करण्यासाठी सदस्यांसाठीची वर्तणुकीची नेमके अर्थात एसओपी पंधरा दिवसांत निश्चित करून मी सर्व सदस्यांना वितरित करीन आणि या मार्गदर्शक मानकांचे उल्लंघन झाल्यास त्याबाबत यथोचित कारवाईदेखील करण्यात येईल, असे विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी सभागृहात सांगितले.