मुंबई - अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या वरळी मतदार संघातील बावन्न चाळ मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन वारंवार बंद पडत होत्या. त्यामुळे या ठिकाणी फेर मतदान घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ही माहिती रवींद्र मयेकर यांनी दिली. या मतदान केंद्रात मतदान करण्यास मिळाला नसल्याने मतदारांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
वरळी मतदारसंघातून शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश माने, वंचित बहुजन आघाडीकडून गौतम गायकवाड, अपक्ष म्हणून बिग बॉस फेम अभिजित बिचुकले निवडणूक लढवत आहे. यामुळे हा मतदार संघ चर्चेचा विषय बनला आहे.
मुंबईत गेले दोन दिवस पाऊस असल्याने सकाळपासून मतदान संथगतीने सुरू आहे. त्याच प्रमाणे वरळी मतदारसंघातही सकाळपासून संथगतीने सुरू होते. दहा वाजल्यानंतर काही मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली. त्याचवेळी वरळीच्या बावन्न चाळ येथील मतदान केंद्र बंद पडल्याची तक्रार करण्यात आली.
मतदान केंद्र बंद पडल्याने निवडणूक विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. वारंवार मशीन बदलूनही मतदान करता न आल्याने मतदार परत गेले. याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रवींद्र मयेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळ पासून फक्त ७२ जणांनी मतदानाचा हक्क बाजावला होता. यानंतर 10 वाजल्यापासून मशीन बंद मतदारांना मतदान करता आलेले नाही. सहा मशीन बदलूनही मतदान सुरू झाले नव्हते. मतदानाची अर्धी वेळ निघून गेल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची तसेच फेर मतदान घेण्याची मागणी केली आहे.
"पावणे दोन तासात पुन्हा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर जे मतदान करण्याची वाट बघत होते. त्यांना मतदान केले आहे. सहा वाजेपर्यंत जे मतदार असतील त्यांना मतदान करण्यास देण्यात येईल. जास्त मतदार असल्यास वेळ वाढवून देण्यात येईल" अशी माहिती वरळी मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.