मुंबई - कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेकडून रेल्वेगाड्या सुरू करण्यात आलेले आहे. मात्र मुंबईतून कोकणात जाणाऱ्या अनेक पॅसेंजर रेल्वे गाड्या अद्याप सुरू करण्यात आल्या नसल्यामुळे कोकणातील चाकरमान्यांना मोठ्या समस्यांना समोरे जावे लागत आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाकडून कोकणात जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करण्याची आणि त्याचबरोबर इतर रेल्वेगाड्या जनरल अनारक्षित बोगी
जोडण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त-
कोकण रेल्वेच्या, मुंबई- मडगांव मार्गावर गर्दीचा भार तसेच आरक्षित तिकिटांची उपलब्धता लक्षात घेता दैनंदिन गाड्या तसेच एक्सप्रेस गाड्यांना अनारक्षित बोगी चालू करण्याचे मागणी अनेकदा केली आहे. मात्र, आतापर्यत शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. मुंबईत काम करणारे अनेक चाकरमानी कोकणातले आहे. त्यामुळे कोकणात येणाऱ्या- जाणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रेल्वेमंत्र्यांनी यावर लक्ष घालून कोकण मार्गावर प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाकडून करण्यात आली आहे.
या गाड्यांची मागणी-
कोकण रेल्वे मार्गावरून अनारक्षित दैनंदिन आंतराज्यीय गाड्या पूर्ववत (अप/डाऊन) सूरू करण्यात याव्यात. ०१००३ तुतारी एक्सप्रेस, ५०१०५ दिवा-मडगांव पॅसेंजर, १०१०३ मांडवी एक्सप्रेस, ५०१०३ दादर-रत्नागिरी पॅसेंजर, १२१३३ मँगलोर एक्सप्रेस आणि १०१११ कोकणकन्या एक्सप्रेसममध्ये अनारक्षित बोगीं उपलब्ध करून द्यावे आणि तसेच कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या लवकरात लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघाकडून करणयात आलेली आहे.
रस्ते मार्गांनी करावा लागतो प्रवास-
कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाकडून यापूर्वीच आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोकणवासीयांच्या या समस्येबाबद निवेदन देण्यात आले आहे. संपूर्ण देशासह महाराष्ट्रात आणि मुंबईत कोरोना विषाणूची प्रादुर्भाव कमी होत आहे. यामुळे जनजीवन हळूहळू पूर्ववत होत आहे. या परिस्थितीत महाराष्ट्रात भारतीय रेल्वेतील मध्य आणि पूर्व रेल्वे सेवा काही प्रमाणात पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वे गाड्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. तसेच मेल-एक्सप्रेस काही गाड्या कोकण मार्गावर धावत आहे. मात्र, त्या गाड्या अनारक्षित डबे जोडण्यात आलेले नाही. त्यामुळे मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना तिकीट मिळत नसल्याने त्यांना रस्ते मार्गांनी प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळे चाकरमान्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे प्रमुख राजू कांबळे यांनी ईटीव्ही भारतला दिली.