मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आज मुंबईत जनता न्यायालय भरवलं. पत्रकार परिषदेत ते विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाबाबत काही घटना तज्ञ चर्चा करणार आहेत. मात्र, यावर शिंदे गटानं आपलं मत व्यक्त केलंय. शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं मंत्री दीपक केसरकर, आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर टीका केली.
तुम्ही न्यायाधीश आहात का : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नियमाला अनुसरूनच निर्णय दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानंसुद्धा शिवसेनेच्या घटनेमध्ये अनेक बाबींची त्रुटी असल्याचं म्हटलं होतं. तसंच शिवसेनेमध्ये घटनेनुसार निवडणुका होत नाहीत. केंद्रीय निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष दोघांनीही त्यावर बोट ठेवलं आहे. ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांना पक्षातून काढून टाकलं, तो निर्णय सुद्धा योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीनं निर्णय घेणं अपेक्षित असताना एक व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही. पक्षाचे काही पदाधिकारी किंवा काही आमदार म्हणजे पक्ष नाही. त्यामुळं विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान देताना, तुम्ही स्वतःला न्यायाधीश समजता का? दिशाभूल करणं सोडून द्या, जनता आता तुम्हाला ओळखून आहे. लोकांच्या दरबारात जाताना तुम्ही आधी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घ्या, असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय.
स्टंटबाजी कशासाठी : यावेळी बोलताना आमदार संजय शिरसाट म्हणाले, संजय राऊत यांनी घडवून आणलेली ही केवळ स्टंटबाजी आहे. संजय राऊत आता गळ्यात भगवं उपरणं घालून येतील. त्यानंतर उद्धव ठाकरे समोर आल्यानंतर त्यांच्या नावाचा जयघोष होईल. हम तुम्हारे साथ है, असं म्हटलं जाईल. आपल्यावर कसा अन्याय झाला, याचा पाढा वाचला जाईल. वास्तविक या लोकांनी अनेक वर्ष पक्षात इतरांवर अन्याय केलेला आहे. पक्षामध्ये कधीही लोकशाही पाळली गेली नाही. या लोकांनी आतापर्यंत दुसऱ्यांवर अन्याय केला आहे. विधानसभा अध्यक्षांनी योग्य निर्णय दिलाय. मात्र, यांना त्याचा त्रास होत आहे. यामुळं जनता यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. अशा पत्रकार परिषदा घेऊन काहीही साध्य होणार नाही. इतकच वाटत असेल, तर सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे का घेत नाही? असा सवालही शिरसाट यांनी यावेळी उपस्थित केला.
हेही वाचा -
- 'राम जन्मभूमी'वरुन संजय राऊतांच्या सवालावर देवेंद्र फडणवीसांची जीभ घसरली, म्हणाले "मी मुर्खांना उत्तर देत नाही"
- पंतप्रधान मोदी आठवड्यातच पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचं करणार लोकार्पण
- भारत जोडो न्याय यात्रेचा आज तिसरा दिवस, राहुल गांधींचं नागालॅंडमध्ये नागरिकांकडून स्वागत