मुंबई : आज पहाटे खोपोली नजीक असलेल्या बोर घाटात पुण्याहून मुंबईत येणाऱ्या बसला अपघात झाला. या अपघातात मुंबईवर दुःखाचा डोंगर कोसळला. कारण बस दरीत कोसळल्याने मुंबईतील 13 जणांचा मृत्यू झाला आहे. माहीम कॉजवे येथील कोळीवाड्यात राहणारी कष्टाळू हर्षदा परदेशी (वय 19) हिचा देखील या अपघातात मृत्यू झाल्याने तिच्या आईवर मोठा आघात झाला आहे. हर्षदा परदेशी हिच्या पश्चात तिची आई भावना आणि धाकटी बहीण कोमल (वय 17) या दोघीच आहेत. हर्षदाचे वडील यांचं 15 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर मोठ्या कष्टाने धुणी भांडी करून भावना परदेशी यांनी हर्षदा, कोमल या दोन मुलींना लहानाचे मोठे केले. चांगले शिक्षण दिले. मात्र, काळाने घाला घातला. भावना यांच्या थोरल्या मुलीला हिरावून घेतले.
कष्टाळू होती हर्षदा : हर्षदाने तेरावी पर्यंत महाविद्यालयीन शिक्षण घेतले. नंतर एका वर्षाचा गॅप ठेवून ती चौदावीची परीक्षा देणार होती. हर्षदा गेल्या दोन वर्षांपासून ढोल ताशा पथकासोबत जोडलेली होती. त्याचबरोबर ती माहीममध्ये असलेल्या डॉ. कांबळे यांच्या दवाखान्यात काम करायची. कामाचा मोबदला म्हणून तिला अंदाजे 5 हजार मिळत होते. आईला मदतीचा हातभार म्हणून ती काम करत असे. तसेच ती ढोल ताशा पथकात देखील एक छंद म्हणून काम करायची.
बातमी ऐकून धक्का बसला : हर्षदाची धाकटी बहीण कोमल परदेशी (17) तिने यंदा दहावीची परीक्षा दिली असून तिच्यावर अति दुःखाचा प्रसंग ओढावला. इतक्या लहान वयातच कोमलला आपल्या बहिणीचा मृतदेह ओळखण्यासाठी रुग्णालयात जावे लागले. त्यानंतर ॲम्बुलन्समधून काळजावर दगड ठेवून बहिणीचा मृतदेह माहेर कोळीवाडा येथील आपल्या घरी घेऊन यावा लागला. मृत हर्षदाची आई भावना परदेशी हिने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, हर्षदा काल सकाळी पुण्यातील एका कार्यक्रमासाठी गेली होती. सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास व्हिडिओ कॉलिंगवर शेवटचा मी हर्षदाला पाहिले. त्यानंतर असे काही होईल असे वाटलेच नव्हते. आज सकाळी तिचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी ऐकून धक्का बसला आहे.
सरकारच्या मदतीचा काय उपयोग : माझ्या मुलीचे काल सायंकाळी साडेपाच वाजता व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलने झाले मात्र, ती आता या जगात नाही. सरकारने दिलेल्या पाच लाखांच्या मदतीबाबत विचारले असता भावना परदेशी यांनी सांगितले की, पाच लाखांच्या मदतीपेक्षा माझ्या मुलीच्या जीव महत्वाचा होता. ती आता या जगात नाही. आता मला या मदतीचा काय उपयोग आहे. माहीम कोळीवाडा येथील श्री गणेश मित्र मंडळावर देखील दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. लहान थोर सर्वच जण या कोळीवाड्यातील हर्षदाच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त करत आहेत.
हेही वाचा - Food Poisoning : पाणीपुरी खाणे पडले महागात; तब्बल 57 जणांना विषबाधा