मुंबई - तौक्ते चक्रीवादळा दरम्यान अरबी समुद्रात अडकलेल्या पी-305 बार्जवरील 188 कर्मचाऱ्यांना नौदलाच्या मदतकार्य दरम्यान वाचविण्यात आले आहे. यामध्ये आतापर्यंत 86 जणांचा मृत्यू झाला आहे. यात पी 305 बार्जचे कॅप्टन राकेश बल्लव यांचा दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली असून मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे देण्यात आला आहे.
डीएनए चाचणी करण्यात आली -
भारतीय नौदलाकडून शोध व बचाव कार्यादरम्यान हाती लागलेल्या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी मृतदेह जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आले होते. यादरम्यान ज्या मृतदेहांची ओळख पटत नव्हती, अशा मृतदेहांची डीएनए चाचणी करण्यात आली. यानंतर हे मृतदेह संबंधित नातेवाईकांना देण्यात आले होते. पी 305 बार्जचा कॅप्टन राकेश बल्लव यांची ओळख पटत नसल्यामुळे एका मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात आली. यानंतर मृतदेह हा राकेश बल्लव याचाच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राकेश बल्लव यांच्या मुलाकडे त्यांचा मृतदेह देण्यात आलेला आहे.
हेही वाचा - कॅप्टनने वादळाचा इशारा गंभीरपणे घेतला नव्हता, पी ३०५ बार्जवरील फायरमनचा आरोप
दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी निष्काळजीपणा बाळगल्याबद्दल ओएनजीसीच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत हे वरिष्ठ अधिकारी हे निलंबित राहणार आहे. चक्रीवादळ येणार असल्याचे माहीत असूनही या तीन अधिकाऱ्यांकडून अरबी समुद्रातील पी-305 बार्जवरील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कुठलीही खबरदारी घेण्यात आली नसल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.