मुंबई - निसर्ग चक्रीवादळाचा धोका असताना ही, मुंबईतल्या समुद्रलगत राहणाऱ्या काही लोकांना अद्याप सुरक्षितस्थळी हलवण्यात आलेले नाही. कुलाबाजवळील बधवार पार्क जेट्टी इथे मच्छीमारांची मोठी वसाहत आहे. मात्र या वस्तीतल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले नाही.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ कोकणासह मुंबईच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. या वादळादरम्यान मोठा पाऊस पडून पाणी साचल्यास किंवा एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी मुंबई अग्निशमन दल सज्ज आहे. शासनाने एनडीआरफच्या (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) 20 तुकड्या मुंबई ठाण्यासह कोकणातील जिल्ह्यात तैनात केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण किनारपट्टीत राहणाऱ्या सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
आठवड्यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ धडकल्यानंतर देश नव्या चक्रीवादळाला सामोरे जात आहे. हे निसर्ग नावाचे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. निसर्ग हे चक्रीवादळाचे नाव भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशने दिलेले आहे.