मुंबई - मुंबईसह कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ काही तासांत धडकणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सकाळी 10 वाजता हे वादळ मुंबईत धडकणार होते. पण, या वादळाची गती मंदावल्याने हे वादळ दुपारपर्यंत मुंबईजवळ येण्याची शक्यता आहे.
सध्या अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे निसर्ग हे चक्रीवादळ कोकण किनापट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे मुंबई, ठाणेसह कोकण किनारपट्टीवर एनडीआरएफच्या 20 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण किनारपट्टीवर राहणाऱ्या सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, सर्व मच्छीमार सुखरुप आपापल्या घरी परतले आहेत. लोकांनी दोन दिवस घरातून बाहेर पडू नये. हा चक्रीवादळ असल्याने उघड्यावर कोणतेही महत्त्वाचे साहित्य ठेवू नये, घराबाहेर कोणीच पडू नका, असे आवाहन केले होते.
या वादळामुळे मुंबईत पालिका, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, नौदल आदी विभाग समुद्रकिनारी तैनात आहेत. मुंबईत समुद्र किनारी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, या वादळाची गती कमी झाल्याने हे वादळ आता दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान मुंबईत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समुद्राच्या भरतीची वेळ सकाळी 10ची होती. यावेळी हे वादळ आले असते तर मुंबईला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला असता. आता वादळ दुपारी येणार असल्याने ही धोक्याची तीव्रता बऱ्याच अंशी कमी झाली आहे.
हेही वाचा - Nisarga Cyclone : चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज, दोन दिवस घराबाहेर पडू नका - मुख्यमंत्री