मुंबई: देशाप्रती असलेली भावना आणि एखादं काम करण्याची हाती घेतलेली जिद्द व्यक्तीला स्वस्थ बसू देत नाही. Cycle Girl On Tour याचं जिवंत उदाहरण म्हणजे मध्य प्रदेशातील आशा मालवीय ही तरुणी आहे. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील नाटराम या छोट्याशा गावात जन्मलेली ही तरुणी देशातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि ऐतिहासिक स्थळांचं महत्त्व जतन व्हावं, यासाठी सायकलवरून देशभ्रमणाला निघाली आहे. पदवयुत्तर पदवी आणि बीपीएड पर्यंतचे उच्च शिक्षण घेतलेली ही तरुणी नोकरी न करता देश सेवा करू इच्छित आहे. त्यासाठी आपल्या सायकलच्या माध्यमातून जनसेवा करण्याचा तिचा मानस आहे.
मध्य प्रदेशातून प्रवासाची सुरुवात: मध्य प्रदेशाच्या स्थापना दिनानिमित्त 1 नोव्हेंबर पासून आशाने आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे. भारतातील सर्व धार्मिक स्थळे ऐतिहासिक स्थळे यांचे महत्त्व अधोरेखित व्हावे, आणि त्यांचे जतन व्हावे. यासाठी आपली ही यात्रा असल्याचे ती सांगते. मध्यप्रदेश सरकारने आशाच्या या उपक्रमासाठी तिला मदत केली. जीपीएस आणि सायकल मध्य प्रदेश पर्यटन मंडळांनी दिली आहे. पर्यटन मंत्री उषा ठाकूर यांनी तिला यासाठी प्रोत्साहितही केल्याचे आशा सांगते. याशिवाय कोणताही निधी अथवा पैसे आपण कोणाकडूनही घेतले नसून स्वतःच्या बळावर ही यात्रा करत आहोत. त्यामुळे कुठे राहायचे काय खायचे याचा बंदोबस्त मी स्वतःच करते, असं आशा सांगते.
20 हजार किलोमीटर करणार प्रवास: मध्य प्रदेशातून सुरू झालेली आपली ही यात्रा सध्या गुजरातमधून महाराष्ट्रात आली आहे. आतापर्यंत 2 हजार किलोमीटरचा प्रवास आपण केला आहे. देशातील सर्व 28 राज्यांमधून 20 हजार किलोमीटरचा प्रवास या यात्रेदरम्यान करण्याचा आपला माणूस आहे असं आशाने सांगितले आहे.
महिला सक्षम आणि सुरक्षित रहाव्यात: या यात्रेदरम्यान आपण महिला सुरक्षित असल्याचे देशातील सर्व महिलांना विश्वास देऊ इच्छित आहे. मी एक तरुणी असून एकटी भारतभर यात्रा करून आपल्या देशातील महिला सुरक्षित असल्याचे दाखवून देणार आहे. त्यामुळे महिलांनी घाबरून न जाता सर्व प्रसंगांना धैर्याने तोंड दिले पाहिजे. तसेच तरुण तरुणांनी छोट्याशा प्रश्नांना घाबरून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलता कामा नये. सर्वांनी प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यावे. यासाठीच आपली ही यात्रा आहे, असे तिने स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार: या यात्रेदरम्यान आशा मालवीय हिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही भेट घेतली. आपल्या विनंतीवरून मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्याबद्दल आशाने मुख्यमंत्र्यांचे आणि महाराष्ट्राचे आभार व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्याचं तिने सांगितले आहे.