मुंबई- राज्यातील तीनही वीज कंपन्या व वीज नियामक आयोगामध्ये समन्वय साधून वीजदर कमी करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. ही मोठी उपलब्धी असून या निर्णयामुळे राज्यातील उद्योग व व्यवसाय वृद्धीसाठी मोठा हातभार लागणार आहे, असा विश्वास प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे.
झूम अॅपच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली. ऊर्जामंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यापासून सध्याच्या कोरोना संकट काळात घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांची माहिती डॉ. राऊत यांनी यावेळी पत्रकारांना दिली. राज्यातील वीज दर सरासरी ७ टक्के कमी करण्यात आला आहे. वाणिज्यिक व औद्योगिक दर येणाऱ्या ५ वर्षांमध्ये वापरनुसार सुमारे १० ते १५ टक्के कमी करण्यात आला आहे. तर, घरगुती विजेचा दर हा वापररानुसार ५ टक्के एवढा कमी करण्यात आला आहे. औद्योगिक व व्यावसायिक वीज ग्राहकांना वाढीव वीज वापरांवर ७५ पैसे प्रति युनिट सवलत राहणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
कृषी ग्राहकांना कोणतीही वीज दरवाढ करण्यात आलेली नाही
औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांवर पुढील ३ महिने स्थीर आकार लागू होणार नाही. कृषी ग्राहकांना कोणतीही वीज दरवाढ करण्यात आलेली नाही. सोलर रूफ टॉप वापरणाऱ्या ग्राहकांना कोणताही अतिरिक्त भार नाही. अदानी, टाटा, बेस्ट व महावितरण या चारही कंपन्यांचे दर कमी करण्यात आले आहेत. जनतेला ग्राहक सेवा देण्यासाठी जे आवश्यक आहे, त्यापेक्षा ही मान्यता अधिकची आहे. सौरउर्जा ग्रीड सपोर्ट चार्ज झीरो केला आहे, यामुळे सौरउर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देणे शक्य होईल. राज्यातल्या उद्योग वृद्धीसाठी मराठवाडा व विदर्भासाठी देण्यात आलेला सब्सिडीचा कॅप वाढविण्यासाठी तसेच उर्वरित महाराष्ट्रासाठी देखिल पॅकेज देण्याबद्दल आम्ही प्रयत्न करीत असल्याचे राऊत यांनी सांगितले.
मागील महिन्याच्या सरासरी बिलावरून वीज देयक तयार करण्यात येईल
औद्योगिक व वाणिज्यिक वापरासाठीचे बील तीन महिन्यापर्यत आकारण्यात येणार नाही. मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या ज्या कंपन्या सुरू राहतील त्यांच्या वापरानुसार बील आकारण्यात येईल. घरगुती वापराच्या बिलांचे मीटर रिडींग घेण्यात येणार नाही. मागील महिन्याच्या सरासरी बिलावरून वीज देयक तयार करण्यात येईल. मार्च महिण्याचे बील १५ मे पर्यंत, तर एप्रिल महिण्याचे बिल ३१ मे पर्यंत भरण्याची सवलत देण्यात आलेली आहे. फ्रँचाईझी कंपन्यांनीसुद्धा त्यांच्या भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी खबरदारी घ्यावी. भिवंडी, मुंब्रा-कळवा व मालेगाव येथील ३ खाजगी वीज वितरण फ्रँचाईझी कंपन्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आढावा घेऊन रमजान, उन्हाळा आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी, नियोजन आणि कृती आराखडा तयार करावा व त्यासाठी फ्रँचाईझी कंपनीने तयार राहावे, असे निर्देश त्यांना देण्यात आल्याची माहिती डॉ. राऊत यांनी दिली.
लॉकडाऊन काळात वीज पुरवठा अखंडित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार बक्षिस
लॉकडाऊन काळात २४ तास विद्युत पुरवठा करण्याचे आव्हान होते. या काळात वीज पुरवठा अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी ज्यांनी मोलाचे योगदान केले अशा अति उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यास योग्य बक्षिस देऊन गौरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांशी थेट संपर्क होऊ नये याकरिता मिटर रिडींग, वीजबिल वितरीत करणे, वीज बिल भरणा केंद्र, वीज चोरी मोहीम, वीज पुरवठा खंडित करणे इत्यादी प्रक्रिया थांबविण्यात आल्या आहेत, असेही राऊत म्हणाले.
प्रदेश काँग्रेसने केलेल्या मदत कार्याची दिली माहिती
कोरोनाच्या संकटात प्रदेश काँग्रेसने केलेल्या मदत कार्याची माहितीही डॉ. राऊत यांनी दिली. देशपातळीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये कोरोना विरोधी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून या कक्षाच्या माध्यमातून प्रत्येक राज्यातील मजूर/कामगार जे महाराष्ट्रात अडकले आहेत अशा लोकांना मदत करण्यासंदर्भात सुचना मिळताच परराज्यातील १ लाख १० हजार कामगारांना काँग्रेसने मदत केली आहे. काँग्रेसच्या आपातकालीन मदत केंद्राच्या माध्यमातून राज्यभरात ३२ लाखांहून अधिक नागरिकांना थेट मदत देण्यात आली आहे, तर १८ लाख ३० हजार नागरिकांना अन्नधान्य आणि राशनचे वाटप करण्यात आले आहे. दररोज ६० हजाराहून अधिक लोकांना जेवण देण्यात येत असून १६ लाख ६० हजार नागरिकांना औषधे, सॅनिटायझर, मास्क, साबण व गरजेच्या वैद्यकीय साहित्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती राऊत यांनी दिली.
१ लाख ५० हजार नागरिकांना धान्य, मास्क आणि सैनिटाइजरचे वाटप
तसेच, आवश्यक ठिकाणी डॉक्टर, पोलीस व प्रशासनाला ५ हजाराहून अधिक पीपीई कीट देण्यात आले तर सांगली, नागपूर, पुणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर या शहरांमध्ये मोबाईल क्लिनिक सेवा सुरू करण्यात आले आहे. २० हजारांहून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी रक्तदान केले तसेच युवक काँग्रेसने रक्तादान शिबीर घेऊन १४ हजार ५१७ रक्त पिशव्या जमा केल्या आहेत. ३ लाख ४ हजार नागरिकांना जेवण दिले, तर १ लाख ५० हजार नागरिकांना धान्य, मास्क आणि सॅनिटाइजरचे वाटप केले. शिवाय सेवादल, एनएसयूआय आणि इतर सर्व सेल मदत कार्यात सहभागी आहेत, अशी माहिती डॉ. राऊत यांनी दिली.
हेही वाचा- खुशखबर! आरोग्य सेवेत लवकरच दाखल होणार 9 हजार डॉक्टर