मुंबई : दादर मठाची स्थापना सन ( 1910 ) ला झाली. दादर मठाच्या वास्तूमध्येच बाळकृष्ण सुरतकर महाराज हे राहत होते. बाळकृष्ण महाराज हे पेशाने शिक्षक होते. त्यांना तात महाराजांची साथ लाभली. तात महाराजांच्या सहवासात राहिल्याने बाळकृष्ण महाराजांना अक्कलकोट स्वामींचा दृष्टांत झाला. त्यानंतर अक्कलकोट येथील ब्राह्मणाच्या घरातून स्वामींच्या पादुका, वस्त्र बाळकृष्ण महाराज घेऊन आले. पादुका इथे दादरच्या मठात आहेत. तर, वस्त्र आणि पोशाख हे सुरत येथे मठात असल्याचे केकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. अलीकडे भक्तांचा येथे दर्शनासाठी ओघ वाढत असून, दरदिवशी अंदाजे २५ हजार भाविक स्वामींच्या दर्शनाला येतात, अशी माहिती केकरे यांनी दिली. स्वामींच्या या मठातील आकर्षण असलेल्या औदूंबराच्या झाडाचे भक्त आवर्जुन दर्शन घेतात. आज गुरुवारी भाविकांची दर्शन घेण्यासाठी मठात रीघ लागलेली असते. देशाच्या विविध भागातून भाविक आज स्वामी समर्थ मठाचा महिमा पाहण्यासाठी येत असतात.
भक्तांची रीघ वाढली : यावेळी बोलताना केकरे म्हणाले, खरं सांगायचं तर भक्तांचे येण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा अर्थ भक्तांच्या कदाचित त्यांचे मानसिक तणाव किंवा त्यांचे असलेले प्रॉब्लेम असतील, ते प्रॉब्लेम स्वामींच्या मठात आल्यानंतर सुटतात अशी, भक्तांची भावना आहे. बऱ्याच जणांना तसा अनुभवसुद्धा आला आहे असही काहीजण सांगतात. आम्ही जेव्हा मठात स्वामींशी बोलतो, तेव्हा त्यांना बरं वाटतं. कदाचित शांतता वाटते. त्यामुळे कदाचित हे एकाने दुसऱ्याला सांगून संख्या वाढलेली आहे. भक्तांचा ओघ खूप वाढलेला आहे. बाळकृष्ण महाराज यांना श्री स्वामी समर्थांनी दृष्टांत दिल्याप्रमाणे महाराजांनी अक्कलकोटला जाऊन आणलेल्या पादुका या दादरच्या मठात आहेत. या पादुका मठाच्या आतील रूममध्ये असलेल्या देवघरात ठेवण्यात आलेल्या आहेत. तर मूळ गाभाऱ्यात चांदीच्या पादुका दर्शनासाठी आहेत. तर श्री स्वामी समर्थांचा पलंग, स्वामींचे वस्त्र आणि पोशाख हे सुरत येथील मठातील गाभाऱ्यात ठेवलेली आहे.
दादर मठातील महत्वाचे उत्सव : आमच्याकडे वर्षाची सुरुवात हे गुरुप्रतीपदाने होते. गुरुप्रतीपदेला आत्ताच गेल्या दहा पंधरा दिवसांपूर्वी गुरुप्रतिपदा होती. त्यावेळेला लघुरुद्र झाला आणि त्याच्यानंतर आता पुढच्या महिन्यात मार्चमध्ये स्वामी जयंती आहे. नंतर एप्रिलमध्ये स्वामी पुण्यतिथी आहे आणि मग नंतर जुलैमध्ये गुरुपौर्णिमा आहे. मग नंतर डिसेंबरमध्ये दत्त जयंती असे हे मोठे उत्सव असतात. चार ते पाच मोठे उत्सव असतात आणि ह्या उत्सवाला लघुरुद्र असतो. त्या लघुरुद्राला सकाळी साडेसहाला सुरुवात होते आणि अकरा साडेअकरापर्यंत संपतो. मग त्यानंतर आरती केली जाते, अशी माहिती केकरे यांनी दिली आहे.
प्रसादाला मिळणार भोग सर्टिफिकेट : याबाबत डॉ. महारुद्र केकरे यांनी माहिती दिली की, सर्वसाधारण जो अभिषेक करतात, लोक अभिषेकसाठी पावती फाडतात. त्या अभिषेकाला पूर्वी आम्ही नारळ देत होतो. तो प्रसाद म्हणून ते नारळ देण्याच्या ऐवजी आम्ही नारळाची म्हणजे ते नारळीपाक बनवून देतो. ती नारळीपाक वडी आम्ही चांगल्या अतिशय कंडीशनमध्ये बनवतो. त्यामुळे भोग ही सेंट्रल गव्हर्मेंटची इन्स्टिट्यूट आहे. ती आम्हाला सर्टिफिकेशन करणार आहेत. अजून त्यांनी आमच्या तयार झालेल्या रुम पाहिलेल्या नाहीत. त्या रूमचे ते येऊन बघतील आणि आम्हाला सर्टिफाय करतील. त्यामुळे त्यानंतर भोगची सर्टिफाइड नारळवडी प्रत्येकाला मिळेल असही ते म्हणाले आहेत.
मठात शनिवारी अहोरात्र भजन : दादर मठाचे ट्रस्टी डॉ. महारुद्र केकरे यांनी सांगितले की, बाळकृष्ण महाराज देखील शनिवारचे अहोरात्र या मठात भजन कीर्तन करत असत. त्याचप्रमाणे मठात होणाऱ्या पारायणा दिवशी तीनशे ते साडेचारशे लिटर दूध हा पारायणासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून दिला जातो. त्याचप्रमाणे अजूनही दर शनिवारी दादर येथील स्वामींचा मठ हा भजन कीर्तनाने रंगून जातो. भजनासाठी येणाऱ्या भाविकांना मध्यंतरादरम्यान चहा दिला जातो. चहाचे महत्त्व असे की, बाळकृष्ण महाराज यांना चहा खूप आवडायचा. त्यामुळे आलेल्या भाविकांना कितीही वेळा येते चहाचा आस्वाद घेता येतो.
कोण आहेत श्री बाळकृष्ण महाराज ? : श्री बाळकृष्ण सुरतकर महाराज यांचा जन्म सुरत येथे २८ ऑक्टोबर १८६६ मध्ये झाला. चुलते शिवशंकर यांचेकडे मुंबईला शिक्षणासाठी आले. मुंबईस आल्यावर त्यांच्यावर आर्यसमाजाच्या शिकवणीचा पगडा बसला. त्यांचे चुलते शिवशंकर कट्टर शिवभक्त त्यांना या गोष्टीचे दुःख झाले. कारण बाळकृष्ण यांना देवाधर्माच्या जास्त आवड नव्हती. त्यांचे शेजारी श्री रामचंन्द्र व्यंकटेश बरडकर उर्फ़ सारस्वत ब्राम्हण भेंडे, हे महाराजांचे गुरु "तात महाराज" श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त रहात असत. गिरगावात बाळकृष्ण महाराज यांना तात महाराजांचा सहवास लाभला आणि त्यांचे आयुष्य भक्तिमय झाले. त्यांनी श्री सदगुरु बाळकृष्ण महाराजांना भुलेश्वरच्या अष्टभुजा देवीच्या देवळात देवीचे हास्यमुखाचे दर्शन देऊन त्यांच्या वागणुकीमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणला. त्याचक्षणी बाळकृष्ण महाराजांनी श्री तात महाराजांना गुरु करुन ते श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त बनले. बाळकृष्ण महाराजांना इंग्रजी आणि संस्क्रूतचे उत्तम ज्ञान होते. ते शिकवण्या घेत तसेच गोकुळदास संस्कृत शाळेत संस्कृत विषयाचे शिक्षक होते. त्यावेळी ते मास्तर या नावाने ओळखले जात. श्री बाळकृष्ण महाराज यांची पत्नी कमलामाता यांना बाबू महाराज हे पुत्र झाले असून बाबू महाराज आणि त्यांच्या पत्नी पद्मामाता. पद्मामाता यांनी दादर मठाच्या ट्रस्टची स्थापना केली. बाबू महाराज आणि पद्मामाता यांना मुलबाळ नव्हते. मात्र, ते स्वामींचे निस्सीम भक्त होते.
मठासाठी अशी शोधली दादरची जागा : काळबादेवी येथील जांभूळवाडीतून बाळकृष्ण महाराज पुढे मालाडात त्यांचे मित्र द्वारकादास यांच्याकडे रहावयास गेले. महाराजांच्या दैवी सामर्थ्याचा प्रसार झाल्यामुळे पुष्कळ लोक त्यांचेकडे येऊ लागले. महाराजांना भजन फार आवडत असे आणि त्यांचेकडे येणाऱ्यांना कटाक्षाने भजन करण्यास गुरुवारी व शनिवारी बोलावीत असत. शनिवारी सबंध रात्र भजन होत असल्यामुळे द्वारकादासांच्या मंडळीस त्रास वाटू लागला. हि गोष्ट कै. विश्वनाथ मोरेश्वर कोठारे (माजी विश्वस्त) आणि त्यांच्या मातोश्री पुतळाबाई यांना कळल्यावर त्यांनी महाराजांना मालाडला मामलेदार वाडीतील आपल्या घरात आणले. तेथेही पूर्विप्रमणेच गर्दी सुरु झाली. महाराजांकडे त्यावेळी कुलाब्यापासून वसई, घाटकोपर, चेंबुरपर्यंत मंडळी दर्शनास आणि भजनास येत असत. इतक्या लांबवरून शनिवारी रात्री ते ही त्याकाळात मालाडला भजनास येणे हे गैरसोयीची असल्याने महाराजांनी कोठेतरी मध्यवर्ती ठिकणी रहाणे सर्वांना सोईस्कर होईल असा विचार भक्तांत उत्पन्न झाला.
सन १९१० मध्ये मठ स्थापन झाला : कै. भाऊसाहेब देशमुख त्यावेळी मुंबई कलेक्टरचे हेडक्लार्क असल्यामुळे दादरची पुढे होणारी वाढ त्यांना माहीत होती. महाराजांच्या सांगण्यावरून भक्त मंडळींनी दादरला जागा बघायला सुरुवात केली. त्यांना एक बंगला सापडला तो भुताटकीचा आणि पडका बंगला म्हणून ओळखला जात असे. मंडळींनी ही गोष्ट महाराजांस कळविली. महाराज म्हणाले,"काही हरकत नाही आपण तेथे समर्थांची स्थापना करुन सर्व भुतांना मुक्त्ती देऊ. आपण परत जावे व कुलुप उघडून आत अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध येईल, नंतर भाडे देऊन ताबडतोब बंगला ताब्यात घ्यावा. भक्त मंडळींना कुलुप उघडल्यावर अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध आला. त्यांनी महाराजांचे सांगण्यावरुन बंगला भाड्याने घेतला. भाड्याने घेतलेला बंगलाच आपल्या आजच्या मठाचे स्थान आहे. त्यानंतर सन १९१० मध्ये मठ स्थापन झाला.
महाराजांची सुरतला आहे समाधी : हा बंगला खूपच जुना असल्याने कालांतराने बंगल्याचे दुरुस्तीचे काम करण्यास सुरु केले. १९१३ मध्ये देखील मठाची दुरुस्ती झाली. त्यानंतर देखील अनेक बदल, दुरुस्त्या झाल्या. २००० मध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता २०२३ ला देखील दुरुस्तीचे काम जलदगतीने सुरु आहे. मार्च महिन्यापूर्वीच मठाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचा मानस ट्रस्टचा आहे. दादर मठाच्या स्थापनेनंतर सन १९११ मध्ये वडवली शेरी बेगमपुरा सुरत, तापी नदीनजीक सुद्धा महाराजांनी श्री स्वामी समर्थांचा मठ स्थापन केला. त्या मठात श्री स्वामी समर्थांचा पलंग, स्वामींचे वस्त्र आणि पोशाख श्री स्वामी समर्थांनी दृष्टांत दिल्याप्रमाणे महाराजांनी अक्कलकोटला जाऊन आणली, ती त्या मठातील गाभाऱ्यात ठेवलेली आहे.
हेही वाचा - Devendra Fadnavis : मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, फडणवीसांचा पुन्हा खळबळजनक दावा