मुंबई - शहरासह राज्यात कोरोना प्रादुर्भाचा विस्फोट झाला आहे. मागील दोन दिवसापासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 25 हजारांच्या वर जात असल्याने, नागरिकांच्या चितेंत भर पडली आहे. मुंबईत देखील कोरोनाबाधितांची संख्या दररोज सुमारे २ ते ३ हजाराने वाढत आहे. अशा परिस्थितीत देखील नागरिकांना मात्र कोरोनाची भीती उरली नसल्याचे चित्र दादर मधील फूल मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे.
कोरोनाचा विसर-
मुंबई शहरात 2020 वर्षीच्या मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत शुक्रवारी गेल्या वर्षभरातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत शुक्रवारी तब्बल 3062 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाकडून अनेक नियमांचे निर्बंध घालण्यात येत आहेत. मात्र, नागरिकांना कोरोनाचा विसर पडल्याचा प्रकार मुंबईतील दादर फुल मार्केट, शिवाजी पार्क या ठिकाणी झालेल्या गर्दीवरून दिसून येत आहे.
आज सकाळच्या सुमारास दादर फुल मार्केटमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी सामाजिक अंतर पालनाच्या नियमांचा फज्जा उडाला होता. तसेच अनेकांनी मास्कचा वापर न केल्याचेही यावेळी दिसून आले. आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दादर फुल मार्केटचे बी के सी येथे स्थलांतर करण्यात येणार होते. मात्र,प्रशासनाकडून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
शिवाजी पार्क मध्येही जॉगिंग करण्यासाठी झाली गर्दी -
दादर फुल मार्केट प्रमाणेच दादर येथील शिवाजी पार्कमध्ये देखील सकाळी व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या मुंबईकरांची गर्दी दिसून आली. मात्र, अशा प्रकारे गर्द होत राहिल्यास आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबईत वाढत्या कोरोना रुग्ण संख्येत अधिकच भर पडण्याची शक्यता आरोग्य तज्ञांनी व्यक्त केली आहे.