मुंबई Fake Sports Shoes Seized : नामांकित स्पोर्टस शूज कंपन्यांचे नाव आणि लोगो असलेला बनावट शूजचा साठा गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षानं जप्त केला आहे. या जप्त केलेल्या शूजची तीन कोटीहून अधिक किंमत असल्याचं मालमत्ता कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक शशिकांत पवार यांनी सांगितले आहे. मुंबई शहरात अनेक मॉल तसंच खासगी शोरुममधून नामांकित स्पोर्टस शूज कंपन्यांची नावे व लोगो असलेल्या बनावट शूजची सर्रासपणे विक्री होत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षास ९ ऑक्टोबरला गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली होती की, वांद्रे पश्चिम येथील लिंक स्क्वेअर मॉल येथील दुकानामध्ये adidas, Nike, CONVERSE या ब्रॅण्डेड कंपन्यांचे नावे बनावट शूज, स्लिपर्सचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आला आहे. तसंच जप्त केलेले बनावट शूज, स्लिपर्स मुंबईतील विविध भागात सर्रासपणे विक्री होत आहे. बनावट वस्तू विकून लोकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार मालमत्ता कक्षाने कारवाई करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली. तसंच गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार पंचासमक्ष एकाच वेळेस नमूद मॉलमधील एकूण ३ दुकाने आणि ३ गोडावूनमध्ये छापा टाकून adidas, Nike, CONVERSE या ब्रॅण्डेड कंपन्यांचे नाव व लोगो असणारे बनावट शूज, स्लिपर्सचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला. या जप्त शूजची किंमत ३ कोटी २६ लाख ५५ हजार ८८८ आहे. कारवाई दरम्यान घटनास्थळाहून तीन इसमांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
खार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद - या कारवाईचा सविस्तर पंचनामा करुन ताब्यात घेतलेल्या मुद्देमालाबाबत संबंधित ब्रॅण्डच्या कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून त्यांच्यामार्फत खार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास मालमत्ता कक्षाकडे देण्यात येत आहे. ही उत्तम कामगिरी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशि कुमार मीना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयकुत (डी स्पेशल) दत्तात्रय नाळे यांच्या निगराणीखाली मालमत्ता कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक शशिकांत पवार, पोलीस निरीक्षक संदिप निगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, पोलीस हवालदार संदिप सुकाळे, अरुण सावंत, चिंतामणी इरनक, विश्वनाथ पोळ, संतोष औटे, पोलीस शिपाई अमित तांबे, धुळदेव कोळेकर, पोलीस हवालदार जगदाळे, पोलीस शिपाई गायकवाड यांनी महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे.
हेही वाचा...