मुंबई - पवई तलावात गणेश विसर्जन स्थळी मंगळवारी रात्री 11 वाजेदरम्यान एक मगर मुक्त संचार करताना आढळली. सुदैवाने यावेळी कुणीही पाण्यात उतरलेले नव्हते. उपस्थित भक्तांनी मगर पाण्यात संचार करत असलेला हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला आहे.
पूर्व उपनगरातील सर्वात मोठा असलेला हा तलाव सध्या पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. नुकतीच या तलावामध्ये दीड दिवसाच्या ते सात दिवसाच्या गणपती आणि गौरींचे विसर्जन मोठ्याप्रमाणात करण्यात आले. ही मगर चादिवलीतील गणेश भक्तांना विसर्जनावेळी दिसली. काही तासांवर आलेल्या गणेश चतुर्थीनिमित्त तलावावर आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तलावात विसर्जनस्थळी मगर दिसल्याने सुदैवाने हानी टळली.
तलावामध्ये खोल पाण्यात मगरी असल्याने पालिका प्रशासनाने नागरिकांना सतर्क केले होते. गणेश विसर्जन स्थळी पालिकेने काही उपायोजनादेखील केल्या होत्या. मात्र, तरीही मगर दिसल्याने सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन तसेच नागरीकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.