मुंबई - गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येमुळे रेल्वे प्रवास किती सुरक्षित आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. २०१९ मध्ये ६ महिलांवर रेल्वे परिसरात बलात्काराच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. याशिवाय दररोज ७ महिलांच्या पर्स धावत्या लोकलमधून चोरी जात असल्याचेही दाखल गुन्ह्यांनुसार उघडकीस आले आहे.
हेही वाचा - एकनाथ खडसेंचाही फोन टॅप झाल्याची आमच्याकडे माहिती - गृहमंत्री
मुंबईत मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्स हार्बर असे चार रेल्वे मार्ग आहेत. यामध्ये एकूण १७ लोहमार्ग पोलीस ठाणे आहेत. या ठाण्यांच्या हद्दीत दाखल गुन्ह्यांनुसार गेल्या वर्षी १५० महिला प्रवाशांची छेड काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा - नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : आरोपी ऋषिकेश देवडीकर पुणे एटीएसच्या ताब्यात
मुंबईतील लोकल प्रवासात दररोज किमान ७५ प्रवाशांचे मोबाईल चोरीला जातात, तर ५५ जणांचे पाकिट मारले जाते. तर रोज साधारण एक प्रवासी फटका गँगचा बळी पडतो. यामुळे गेल्या वर्षभरात ३ पेक्षा जास्त प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याशिवाय रेल्वेने प्रवास करताना धावत्या लोकलमधील प्रवाशांना दगड मारणे, दारुच्या बाटल्या फेकण्याच्या ३१ घटना घडल्या आहेत. ज्यात २३ प्रवाशी जखमी झाले असून ७ प्रवाशांना कायमचे अपंगत्व आले आहे. आतापर्यंत अब्जावधी रुपयांचा महसूल रेल्वे प्रवाशांनी प्रशासनाला दिला आहे. मात्र, तरीही रेल्वेचा प्रवास सुरक्षित तर नाहीच शिवाय रेल्वे प्रशासनाला याचे गांभीर्यही नाही, हे यातून दिसून येत आहे.