मुंबई - कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येणाऱ्या एका 43 वर्षीय व्यक्तीने पालिकेच्या नायर रुग्णालयात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कोरोनाची लागण झाल्याच्या भीतीने हा रुग्ण मानसिक तणावाखाली होता. या रुग्णाने बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असून, या प्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत कोरोनाच्या रुग्णाने केलेली ही तिसरी आत्महत्या आहे.
माहीम मच्छिमार कॉलनी येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्याला 31 मे रोजी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, त्याला ताप आणि सर्दी असल्याने पुन्हा टेस्ट करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी हा रुग्ण वॉर्ड नंबर 16 च्या बाथरूममध्ये सकाळी 10 च्या दरम्यान गेला होता. त्याला बाथरूममध्ये जाताना इतर रुग्णांनी पाहिले. मात्र, हा रुग्ण बराच वेळ बाहेर न आल्याने बाथरूमचा दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी आतमध्ये या रुग्णाला टॉवेलने फाशी लावून घेतल्याचे निदर्शनास आले.
आग्रीपाडा पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या रुग्णाचा पहिला चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यापासून तो मानसिक तणावाखाली होता असे पोलिसांनी सांगितले.
तिसरी आत्महत्या -
कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईमध्ये तिसरी आत्महत्या झाली आहे. सेव्हन हिल रुग्णालयात एका जेष्ठ नागरिकाने कोरोना झाल्यामुळे गळफास लावून आत्महत्या केली आहे. वरळी येथे राहणाऱ्या एका 29 वर्षीय महिलेने आत्महत्या केली होती. त्यानंतर आता नायर रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका रुग्णाने आत्महत्या केली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या तीन जणांनी आत्महत्या केली आहे.