मुंबई Baby Selling Gang Busted : मुंबई पोलिसांनी नुकत्याच जन्मलेल्या बाळांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून नवजात अर्भकाची पाच लाख रुपयांना विक्री करणाऱ्या सहा महिलांना अटक केलीय. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याची सखोल चौकशी सुरू असून यात इतर कोणाचा समावेश आहे का, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी दिलीय. दरम्यान या आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, त्यांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
सापळा रचून दोन महिलांना घेतलं ताब्यात : पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॉम्बे परिसरात एक बनावट नर्सिंग होम चालवलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या जागेवर एका मुलाची कोणत्याही कागदपत्रांशिवाय पाच लाख रुपयांना विकली गेल्याची धक्कादायक माहिती मिळताच पोलिसांनी सोमवारी सापळा रचून दोन महिलांना पकडलं आणि त्यांच्या ताब्यातून एक नवजात शिशू जप्त केलंय. या दोघांनी टोळीत सामील असलेल्या इतर चार महिलांची माहिती दिली. त्यापैकी एक बनावट डॉक्टर आहे. तर आरोपींपैकी एका महिलेवर अशाच गुन्ह्यासाठी तब्बल सहा गुन्हे दाखल आहेत. या महिलांना भारतीय दंड संहितेच्या कलम 370 (व्यक्तींची तस्करी) आणि इतर संबंधित तरतुदी, बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा आणि महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय कायद्यांतर्गत अटक करण्यात आलीय.
बोगस डॉक्टर काय करायची : या टोळीतील महिला बोगस डॉक्टर तसेच दलाल महिलांच्या मदतीनं गरजू आणि गरीब तसंच नवऱ्यानं टाकलेल्या महिलांचा शोध घ्यायच्या. या महिलांना डिलिव्हरीचा खर्च तसंच पुढं बाळाच्या बदल्यात पैशांचं आमीष दाखवून जाळ्यात ओढायचं. डिलिव्हरीपर्यंत या महिलांची देखभाल करायची. महिलेची डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाच्या शोधात असलेल्या दांपत्यांना त्यांची विक्री करत होती. शिवाजीनगर भागात लहान बाळांची विक्री होत असल्याची माहिती मिळताच बॉम्बे पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रगटीकरण पथकानं पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन नवजात बालकांनाही ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यातील बोगस डॉक्टर दहावी पास असून तिनं रेडिओलॉजीचं शिक्षण घेतलंय.
आरोपींना 14 दिवसांची कोठडी : पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना सांगितलं की, याप्रकरणातील सहाही महिला आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय.
हेही वाचा :