मुंबई - वसुली प्रकरणात आरोपी असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा स्वीय सचिव कुंदन शिंदे याला आज (३ फेब्रुवारी) मुंबई विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील एका साक्षीदाराचा जबाब अभियोग पक्षाने दाखल न केल्याबद्दल विशेष पीएमएलए न्यायालयाने तपास यंत्रणेविरोधात नाराजी व्यक्त केली.
कुंदन शिंदेंवर आरोप - कुंदन शिंदे हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी पीए होते. सीबीआयच्या (CBI ) वतीने दाखल करण्यात आलेल्या शंभर कोटी कथित वसुली प्रकरणातील कुंदन शिंदे हे आरोपी क्रमांक 3 आहेत. ईडीच्यावतीने आरोप पत्रामध्ये कुंदन शिंदे यांच्या संदर्भात असे म्हटले होते की सचिन वाझे यांना मुंबईतील बार अँड रेस्टॉरंट मालकांकडून वसुली करण्याचे निर्देश देण्यात आले होते. हे निर्देश अनिल देशमुख यांनी कुंदन शिंदे यांना दिले होते, असा CBIच्या वतीने आरोपपत्रात म्हटलेले आहे.
काय आहे प्रकरण? - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता.
यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली होती. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. कुंदन शिंदे यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष CBI कोर्टामध्ये जामीन अर्ज दाखल केला होता. कुंदन शिंदे यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जाला CBI ने विरोध केला होता. आज कुंदन शिंदे यांना जामीन मिळाला आहे.