मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार शहरात होऊ नये याकरिता परदेशातून आलेल्या नागरिकांना मुंबई महानगरपालिकेने वेगवेळ्या ठिकाणी क्वारंटाईन केले आहे. मात्र, अनेकजण ही गोष्ट गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घाटकोपरमध्ये काही दिवसांपूर्वी परदेशातून आलेले एक दाम्पत्य परिसरात सर्रास फिरताना दिसत होते.
रहिवाशांच्या तक्रारीनुसार पालिका आणि पोलीस प्रशासनाने त्या दाम्पत्यास विभागातील एका हॉटेलमध्ये 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन केले. देशाची आर्थिक राजधानी मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाने ठप्प झाली आहे. पालिका आणि राज्य सरकार या विषाणूचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहेत. अशात लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याने सरकारच्या नियोजनास खीळ बसत आहे.
घाटकोपर परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने परदेशातून संक्रमण काळात आलेल्या नागरिकांना पालिका एन विभाग आणि पोलिसांनी होम क्वारंटईनचे आदेश दिले होते. यातीलच एक हे दाम्पत्य परदेशातून आले होते. त्यांना होम क्वारंटाईनचे आदेश देण्यात आले होते. मात्र ते सर्रास विभागात फिरताना लोकांना आढळत होते.
![दाम्पत्याला पोलिसांनी केले 'हॉटेल क्वारंटाईन'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-01-vik-ghatkopardamptycorontil-vis-mh10014_01042020071636_0104f_1585705596_802.jpg)
याबाबत पालिका एन विभागातर्फे वारंवार त्यांना सूचना आणि नोटीस ही देण्यात आली होती. पोलिसांनीदेखील याबाबत त्यांना सूचना केल्या होत्या. मात्र, तरीदेखील हे दाम्पत्य सुचनांचे पालन करत नव्हते. अखेर पालिका एन विभागाने पोलिसांच्या मदतीने या दांपत्याला घाटकोपरमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले. वारंवार सूचना देऊनदेखील अनेकजण होम क्वारंटाईनला गांभीर्याने घेत नसल्याने आता प्रशासनाने अशा प्रकारे कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे.